आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांशी चर्चा करत आहेत. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील काही गेमिंग इन्फ्लुअन्सर्सची भेट घेतली आहे. गेल्या काही वर्षांत गेमिंग क्षेत्रातील या इन्फ्लुअन्सर्सनाही चांगली मान्यता मिळाली आहे. त्यांचेही फॉलोवर्स मिलिअन्सच्या घरात असल्याने त्यांच्या समस्या सोडवण्याकडे भारतीय जनता पक्षाने आता भर दिला आहे.

गेमिंग इन्फ्लुअन्सर्सची भेट घेतल्याचा व्हीडिओ प्रसिद्ध झाला आहे. गेमिंग क्षेत्रातील इन्फ्लुअन्सर्स आणि ई-स्पोर्ट्स एथलिट्सबरोबर मोदींनी गेमिंग क्षेत्राविषयी चर्चा केली. नमन माथुर, अनिमेश अग्रवाल, मिथिलेश पाटणकर, पायल धारे, अंशु बिष्ट, तीर्थ मेहता आणि गणेश गंगाधर या इन्फ्लुअन्सरसोबत मोदींनी चर्चा केली.

हेही वाचा >> पंड्या बंधूंना बदनामीची धमकी

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी गेमिंग इन्फ्लुअन्सर्सबरोबर त्यांचा परिचय करून घेतला. या क्षेत्राला प्रोफेशनचा दर्जा दिला जावा का, त्यासाठी काय करता येईल, यावर या भेटीत चर्चा झाली. या क्षेत्रात तुम्ही दोन पद्धतीने तुमचं करिअर घडवू शकता, असं यावेळी इन्फ्लुअन्सर्सने मोदींना सांगितलं. या क्षेत्रात तुम्ही ई-स्पोर्ट्स बनू शकता किंवा गेमिंग कंटेट क्रिएटर म्हणून तुम्ही तुमची ओळख बनवू शकता, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं. याशिवाय या क्षेत्रातील आव्हानांबाबतही मोदींनी चर्चा केली. तसंच, त्यांनी काही खेळ खेळूनही पाहिले.

चर्चेदरम्यान, गेमर्सने सांगितलं की खेळादरम्यान त्यांचा एक गेमिंग कोड असतो. यावेळी मला लोकांनी आधीच नमो हे नाव दिलं असं मोदी उपहासात्मक म्हणाले. तसंच, या क्षेत्रासंबंधीत असलेले आव्हान त्यांना मेल द्वारे कळवण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा >> कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: फिरुझाकडून गुकेश पराभूत

गेमिंग क्षेत्राला मिळणार दिशा?

केवळ आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळच नाही तर, गेल्या वर्षी मुंबईतील आयओसी सत्रादरम्यान आयओसी प्रमुख थॉमस बाक यांनी जाहीर केल्यानुसार पुढील वर्षी ऑलिम्पिक एस्पोर्ट्स गेम्स अस्तित्वात आल्यावर ई-स्पोर्ट्सनाही आणखी वैधता मिळू शकणार आहे. ई-स्पोर्ट्सकडे पूर्वी करिअर म्हणून पाहिले जात नव्हते. व्यसन म्हणूनच याकडे पाहिले जायचं. काहीजणांनी ई-स्पोर्ट्सला जुगारही म्हटलं आहे. परंतु देशातील आघाडीच्या खेळाडूंनी पंतप्रधानांची भेट घेतल्याने आता या क्षेत्रालाही योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे.