आशिया चषक स्पर्धेत हस्तांदोलनाच्या मुद्यावरून वातावरण पेटलेलं असताना, फुटबॉलच्या मैदानात पाकिस्तान संघाबाबत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाकिस्तानने तोतया फुटबॉल संघ पाठवल्याचा प्रकार जपानच्या निदर्शनास आला आहे. या नकली संघाला जपानने मायदेशी रवाना केलं आहे.
मानवी तस्करीचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जपानमध्ये आयोजित फुटबॉल स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ म्हणून एक तुकडी दाखल झाली. पण हा खरा संघ नव्हता. त्यांच्याकडची कागदपत्रं खोटी होती. ते फुटबॉलपटू असल्याचं भासवत होते. सियालकोटहून आलो असा दावा त्यांनी केला. मात्र हा सगळा प्रकार बोगस असल्याचं जपान प्रशासनाच्या लक्षात आलं.
पाकिस्तानच्या फेडरल इनव्हेस्टिगेशन एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, फुटबॉल संघ असल्याचं भासवत २२ जण सियालकोटहून जपानचा पोहोचले. जपानमधल्या विमानतळ अधिकाऱ्यांनी संशय आला. त्यांनी कागदपत्रांची शहानिशा केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
एफआयने मलिक वकास याला मुख्य आरोपी म्हणून अटक केली आहे. गुजरानवाला पोलीस स्थानकात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकासने गोल्डन फुटबॉल ट्रायल नावाने फुटबॉल क्लब सुरू केला. त्याने खेळाडू वाटतील अशा पद्धतीने लोकांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. जपानला जाण्याकरता त्याने प्रत्येकाकडून ४ मिलिअन एवढी प्रचंड रक्कम घेतल्याचं समजतं. यासंदर्भात फेडरल एजन्सीकडून तपास सुरू आहे.
क्रिकेटच्या मैदानावर आशिया चषक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्यामुळे पाकिस्तानचा संघ चर्चेत आहे. भारत-पाकिस्तान लढतीत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा यांनी नाणेफेकीच्या वेळेस हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन नाकारलं. या प्रकारामुळे नाराज होऊन पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. पत्रकार परिषदेला त्याच्याऐवजी प्रशिक्षक माईक हेसन उपस्थित होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हे प्रकरण पुढे रेटत सामनाधिकाऱ्यांना लक्ष्य केलं. पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन करू नका अशी सूचना दिल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला. पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी पीसीबीने केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास उर्वरित सामन्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पाकिस्तानने दिला.
एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांनी प्राण गमावले होते.याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्धव्सत केले. यानंतर भारत-पाकिस्तान सामना होणार का याविषयी साशंकता होती. मात्र केंद्र सरकारने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. आयसीसी तसंच आशिया चषक यासारख्या स्पर्धांमध्ये भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळेल मात्र द्विराष्ट्रीय मालिका होणार नाही.
रविवारी झालेला सामना पहलगाम हल्ल्यानंतरचा पहिलाच होता.