Pragyan Ojha And RP Singh, BCCI Selectors: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआयच्या) निवडसमितीत मोठा बदल होणार आहे. बीसीसीआयकडून निवडसमितीतील २ पदं भरून काढण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. निवडसमितीचा भाग असलेल्या एस. शरत आणि सुब्रतो बॅनर्जी यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. ही जागा भरून काढण्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. ज्यात २ माजी भारतीय खेळाडूंच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचे माजी खेळाडू प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग हे दोघेही निवडसमितीचे नवे सदस्य बनू शकतात. यासह उत्तर प्रदेश संघाचे माजी वेगवान गोलंदाज आशिष विंस्टन जेदी आणि हिमाचल प्रदेशचे शक्ती सिंग हे देखील या पदासाठी उमेदवार होते.
बीसीसीआयकडून या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रता ठेवली होती. ज्या खेळाडूंना कमीत कमी ७ कसोटी सामने किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ३० सामने, १० वनडे किंवा २० प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव असेल ते खेळाडू या पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच अर्ज करणाऱ्या खेळाडूने कमीत कमी ५ वर्षाआधी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला हवी. अर्जदार ५ वर्ष बीसीसीआय किंवा कुठल्याही क्रिकेट समितीचा भाग असेल, तर तो या पदासाठी योग्य ठरणार नाही.
आरपी सिंग हा भारतीय टी-२० वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग आहे. २००७ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने विजयाची नोंद केली होती. या विजयात आरपी सिंगनेही मोलाची भूमिका बजावली होती. आरपी सिंगने २००५ ते २०११ दरम्यान १४ कसोटी, ५८ वनडे आणि १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर प्रज्ञान ओझाने २००८ पासून ते २०१३ दरम्यान २४ कसोटी, १८ वनडे आणि ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आता हे दिग्गज या समितीचा भाग होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.