पीटीआय, पॅरिस

भारताच्या लक्ष्य सेनला पुन्हा एकदा पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयर्लंडच्या नवख्या न्हाट एन्गुयेन याने लक्ष्यचा २१-७, २१-१६ असा पुराभव केला. लक्ष्यने हाँगकाँग स्पर्धेच अंतिम फेरी गाठली होती. मात्र, ती लय त्याच्या खेळात कुठेही दिसून येत नव्हती.

विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात डेन्मार्क स्पर्धेत लक्ष्यने सलामीच्याच लढतीत एन्गुयेन याचा पराभव केला होता. एन्गुयेन याच्या जोरकस स्मॅशचा सामना करताना लक्ष्यला सामन्यात संघर्ष करावा लागत होता. त्याचे फटकेही स्वैर ठरत होते. त्याच्या एकूणच खेळात अचूकतेचा अभाव होता.

पहिल्या गेमला सुरुवातीलाच राहिलेल्या २-७ अशा पिछाडीतून लक्ष्य बाहेरच येऊ शकला नाही. ही पिछाडी पुढे ७-१९ अशी वाढली आणि एन्गुयेनने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेमला लक्ष्यने थोडा प्रतिकार केला. अगदी १-६ अशी पिछाडी त्याने ४-६ अशी भरून काढली होती. पण, पुन्हा एकदा स्वैर फटक्यांमुळे त्याला लढतीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले. गेमच्या मध्यातील ५-११ अशी पिछाडी लक्ष्यने ११-१५ अशी कमी केली. परंतु, त्यानंतर त्याला केवळ पाचच गुणांची कमाई करता आली.