पॅरिस : सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या भारताच्या आघाडीच्या पुरुष दुहेरी जोडीकडून आज, मंगळवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल.

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असणारी भारतीय जोडी गेल्या आठवड्यात डेन्मार्क स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झाली होती. त्यापूर्वी, हाँगकाँग आणि चीन मास्टर्सच्या अंतिम फेरीत त्यांनी धडक मारली होती. फ्रेंच स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ते इंडोनेशियाच्या मुहम्मद रियान अर्दियांतो व रहमत हिदायत या जोडीविरुद्ध खेळतील. सात्त्विक-चिरागने २०२२ आणि २०२४ मध्ये फ्रेंच स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यांनी यावर्षी पॅरिस येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दुसरे कांस्यपदक मिळवले होते.

भारताच्या अन्य खेळाडूंमध्ये हाँगकाँग स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या लक्ष्य सेनसमोेर पुन्हा एकदा आयर्लंडच्या नहत गुयेनचे आव्हान असेल. तर, अमेरिकन स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या आयुष शेट्टीचा सामना जपानच्या कोकी वतनबेशी असेल. महिला एकेरीत अनमोल खरबसमोर पहिल्या फेरीत कोरियाच्या अग्रमानांकित एन से-यंगचे आव्हान असणार आहे. अनुपमा उपाध्यायची गाठ चीनच्या चौथ्या मानांकित हान यू तर, उन्नति हुडाशी गाठ मलेशियाच्या करुपाथेवन लेत्शानाशी पडेल. पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ति रॉय आणि साई प्रतीक आव्हान उपस्थित करतील. तसेच, महिला दुहेरीत कविप्रिया सेल्वम और सिमरन सिंग तसेच, पांडा भगिनी रुतुपर्णा आणि श्वेतपर्णा यांच्यात पहिल्या फेरीचा सामना होईल. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला व तनिषा क्रॅस्टो आणि रोहन कपूर व रुत्विका शिवानी गड्डे चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असतील.