बॉलिवूडमध्ये असे फार कमी कलाकार आहेत जे कोणत्याही भूमिकेत चपखलपणे बसतात. यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेता हृतिक रोशन. रोमँण्टीक, विनोदी, साहस अशा कोणत्याही भूमिका त्याच्या वाट्याला आल्या तरी तो सहजपणे त्या पेलतो. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘सुपर 30’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानंतर तो ‘क्रिश 4’ च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. हृतिकचे जगभरामध्ये असंख्य चाहते असून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीदेखील हृतिकचे चाहते असून त्याने आपल्या बायोपिकमध्ये काम करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सौरव गांगुली यांनी एका टॉक शोदरम्यान हृतिक रोशनच्या अभिनयाचं कौतुक केलं, सोबतच जर माझ्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती झाली तर त्यात हृतिकनेच काम करावं अशी इच्छा व्यक्त केली.

अलिकडेच हृतिक आणि टायगर श्रॉफ यांची मुख्य भूमिका असलेला वॉर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने केवळ ८ दिवसांमध्ये तुफान कमाई केली. इतकंच नाही तर आतापर्यंत या चित्रपटाने ३१८.०१ कोटींचा गल्ला जमवला आहे.