Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर गेल्या काही काळापासून टीकेचा धनी ठरत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव झाल्यानंतर गौतम गंभीरच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. या टीकेला गौतम गंभीरने त्याच्या रोखठोक शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाबाबत बोलत असताना गंभीर म्हणाला, “मी हे काम हाती घेतले तेव्हाच मलाही माहीत होते की, यात चढ-उतार येतील. वातानुकूलित कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या खूश करणे माझे काम नाही तर देशाला अभिमान मिळवून देणे हे माझे काम आहे.”
एबीपी इंडियाच्या २०४७ समिटमध्ये बोलत असताना गौतम गंभीरने माजी क्रिकेटपटूंवर जोरदार टीका केली. गंभीर म्हणाला की, काहीजण मागच्या २५ वर्षांपासून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसले आहेत. त्यांना वाटते भारतीय क्रिकेट त्यांची जहागीर आहे. पण तसे बिलकूल नाहीये. भारतीय क्रिकेट हे भारताच्या लोकांचे आहे.
गौतम गंभीरने भारताला २००७ साली पहिला टी-२० विश्वचषक आणि २०११ साली एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. तसेच २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोख बक्षीस नाकारल्याबद्दलही त्याने भाष्य केले. गंभीर म्हणाला, मी रोख बक्षीस नाकारले म्हणून माझ्यावर प्रश्न उपस्थित केले गेले. हे अनिवासी भारतीय लोक भारतातून पैसा कमवतात आणि कर वाचविण्यासाठी स्वतःला अनिवासी भारतीय दाखवतात.
गौतम गंभीर पुढे म्हणाला की, मी कोणत्याही गटाचा किंवा क्लबचा प्रशिक्षक नाही. राजकारण खेळण्यातही मला रस नाही. मी एक स्वाभिमानी संघ तयार करण्यासाठी आलो आहे, जो निर्भयपणे आपला खेळ दाखवू शकेल. समालोचकांनी हे ध्यानात घेतले पाहीजे की, क्रिकेट कुणाचीही जहागीर नाही. हे लोक परदेशी नागिरकत्व घेऊन कर वाचवत आहेत. पण मी देशातच राहून माझा कर भरतो.