इंग्लंडमध्ये जूनपासून रंगणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत भारतीय संघ मैदानात उतरणार असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यानंतर सोमवारी भारतीय क्रिकेट निवड समितीने मिनी विश्वकप Champion Trophy समजल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठीच्या संघात गौतम गंभीरकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केले. विराटच्या संघामध्ये आयपीएलमध्ये खंबीर खेळी करूनही गंभीरला स्थान मिळालेले नाही. सध्या सुरु असणाऱ्या इंडियन प्रिमियर लीगच्या स्पर्धेत शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व करणाऱ्या गौतम गंभीरने संघासह स्वत: दमदार खेळी केली आहे. या स्पर्धेमध्ये तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत झालेल्या १२ सामन्यामध्ये त्याने ४ अर्धशतकांच्या जोरावर स्पर्धेमध्ये ४२५ धावा केल्या आहेत. त्याच्या खेळीमुळे तो भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. या चर्चेवर चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील निवडीसाठी नव्हे तर संघ जिंकावा, असे गौतम गंभीर म्हणाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाच्या निवडीपूर्वी टी २० च्या खेळीच्या जोरावर एकदिवसीय संघात निवड अशक्य असल्याचे सांगत गंभीरने विराटच्या संघात स्थान मिळणार नसल्याची पूर्वभाकीतच केले होते. आयपीएलच्या सामन्यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गंभीर म्हणाला होता की, टी २० स्पर्धेतील खेळीमुळे एकदिवसीय सामन्यासाठीचे दरवाजे उघडणे कठीण असते. या प्रकारातील खेळीमुळे मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी निवड व्हायला नको, या मताशी मी स्वत: सहमत आहे. यावेळी त्याने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत निवड व्हावी म्हणून नाही तर संघ जिंकावा म्हणून मैदानात दमदार खेळत असल्याचेही म्हटले होते. गौतम गंभीर २०१३ पासून एकदिवसीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही. भारतीय दौऱ्यावर आलेल्या पाहुण्या इंग्लडविरुद्ध त्याने अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी गौतम गंभीरला संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, यावेळी तो फारशी चांगली कामगिरी करु शकला नव्हता.

 

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goutam gambhir not selected championstrophy squad in indian team