BCCI Annual Meeting: येत्या २८ सप्टेंबरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयची वार्षिक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग पंजाब क्रिकेट असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही बैठक अतिशय महत्वाची असणार आहे. या बैठकीत पाच अधिकाऱ्यांची निवड नियुक्ती केली जाणार आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत केवळ हरभजन सिंग नसेल. तर हरभजन सिंगसह भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल आणि बोर्डच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी निवडणूक देखील पार पडणार आहे.
वार्षिक बैठकीत बीसीसीआयची पदं भरून काढण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ज्यात बीसीसीआय सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संयुक्त सचिव आणि खजिनदार या पदांचा समावेश आहे. यावेळीही राज्य संघ बीसीसीआय अध्यक्ष म्हणून माजी खेळाडूची निवड करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
याआधी सौरव गांगुली यांची बीसीसीआय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. २०१९ मध्ये सौरव गांगुली यांनी हे पद सांभाळलं होतं. त्यानंतर २०२२ मध्ये भारताचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआय अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
हरभजन सिंगची पंजाब क्रिकेट असोसिएशनचा सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तो पहिल्यांदाच बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत हजेरी लावणार आहे. त्यामुळे बीसीसीआयचा पुढील अध्यक्ष कोण होणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
याआधी या पदासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र, सचिनच्या टीमने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. सचिनच्या टीमने आपल्या निवेदनात म्हटले की, “भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआयच्या) अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकरच्या नावाचा विचार किंवा नामांकन करण्याबाबत काही वृ्त्ते आणि अफवा पसरवल्या जात असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. आम्ही सर्वांना या अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करतो.”