चेन्नई : जिंकण्याची दृढनिश्चिती आणि समर्पित भावनेने खेळ करताना भारताच्या हरिकृष्णन ए. रा याने भारताचा ८७व्या ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळविला.

स्वित्झर्लंड आणि स्पेनमध्ये दोन पात्रता निकष (नॉर्म) मिळविल्यानंतर चेन्नईच्या हरिकृष्णन ए. रा याने फ्रान्स येथील स्पर्धेत तिसरा आवश्यक ‘नॉर्म’ मिळवून तीन महिन्यापूर्वी प्रशिक्षक श्याम सुंदर यांना दिलेला शब्द खरा केला. युरोपमधील स्पर्धा खेळून आपण ग्रँडमास्टर बनूनच मायदेशी परत येईन असा शब्द हरिकृष्णनने दिला होता. फ्रान्स येथील प्लाग्न आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात २३ वर्षीय हरिकृष्णनने ग्रँडमास्टरचा तिसरा ‘नॉर्म’ मिळविला. हरिकृष्णन ८७वा भारतीय आणि तमिळनाडूचा ३२वा ग्रँडमास्टर ठरला.

वयाच्या पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळायला सुरुवात करणाऱ्या हरिकृष्णनने जुलै २०२३ मध्ये स्वित्झर्लंड येथील स्पर्धेत पहिला ‘नॉर्म’ मिळविला. त्यानंतर दुसरा ‘नॉर्म’ त्याने स्पेनमधील स्पर्धेत मिळविला. समर्पित भावनेने खेळण्याच्या प्रवृत्तीने वयाच्या सातव्या वर्षीय त्याने ‘फिडे’ गुणांकन मिळविले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय युवा खेळाडू ठरला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविला. अर्थात, ग्रँडमास्टर बनण्यासाठी त्याला आठ वर्षे वाट बघावी लागली.

भाऊ वेंकटा कृष्णन याला खेळताना पाहून बुद्धिबळ खेळण्याची मला गोडी लागली. आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविल्यानंतर मी अनेक वर्षे त्यावरच समाधान मानले होते. साधारण २०२२ पासून मी पुन्हा एकदा बुद्धिबळ गांभीर्याने खेळू लागलो. सातत्याने स्पर्धेत सहभाग घेऊ लागलो. प्रशिक्षक श्याम सरांबरोबर मेहनत वाढवली, असे हरिकृष्णन म्हणाला. विशेष म्हणजे हरिकृष्णनची आई रेनगा नाचर या आंतरराष्ट्रीय आर्बीटर आहेत.

‘‘ग्रँडमास्टर बनल्याचा आनंद तर आहेच. पण, मला इथेच थांबायचे नाही. युरोपमधील स्पर्धेतून मायदेशी परतताना ग्रँडमास्टर बनूनच परतायचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे, आता मला मायदेशात पाऊल ठेवण्यापूर्वी माझे गुणांकन २५३० ते २५४०च्या आसपास आणायचे आहे,’’ असेही हरिकृष्णन म्हणाला.

हरिकृष्णनने आता उद्दिष्ट बदलले आहे. त्यामुळे त्याला नियोजनातही बदल करावा लागेल. खेळात सातत्य आणि सुधारणा दाखवावी लागेल. डावाच्या सुरुवातीवर आम्ही भर देत आहोत. यातही क्रामनिकच्या आवडत्या रेटी ओपनिंग पद्धतीचा आम्ही अधिक सराव करत आहोत, असे हरिकृष्णनचे प्रशिक्षक श्याम यांनी सांगितले. श्याम सध्या जॉर्जियात महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघासोबत आहेत.

अधिक प्रगल्भ होण्यासाठी त्याने आता किमान दोन मोठ्या स्पर्धा आणि पाच-सहा कमकुवत स्पर्धा खेळायला हव्यात. अशा स्पर्धातून पहिल्या तीनमध्ये येण्याची शक्यता असते. यामुळे आत्मविश्वास वाढायला मदत मिळते. त्याच वेळी आता त्याने २६०० ते २६५० गुणांकन असलेल्या ग्रँडमास्टर्सना हरवण्याचा प्रयत्न करण्याचीही गरज असल्याचा सल्ला प्रशिक्षक श्याम यांनी दिला.

वयाच्या पंधराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टर ठरल्यानंतर हरिकृष्णनला ग्रँडमास्टर बनण्यासाठी आठ वर्षे वाट पहावी लागली. ग्रँडमास्टर बनण्याचा आनंद व्यक्त करतानाच हरिकृष्णनने आता युरोपमधून मायदेशी परतण्यापूर्वी २५४० पर्यंत गुणांकन वाढविण्याचा निर्धार केला आहे.

पाठोपाठ दुसरा ग्रँडमास्टर

●अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय मास्टर किताब टिकवून राहिलेला हरिकृष्णन २०२२ मध्ये श्याम मनोहर यांच्या अकादमीत ग्रँडमास्टर बनण्याच्या उद्देशाने दाखल झाला.

●त्यानंतर हरिकृष्णन याने झपाट्याने प्रगती करत आपले उद्दिष्ट साध्य केले. श्याम मनोहर यांच्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे त्यांनी काही महिन्यांच्या आत दोन ग्रँडमास्टर दिले.

●हरिकृष्णनपूर्वी काही महिने आधी त्यांचा दुसरा शिष्य श्रीहरी एल. आर. हा भारताचा ८६व्या ग्रँडमास्टर बनला होता.