Indian Team World Cup Trophy Celebration Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महिला विश्वचषक २०२५चा अंतिम सामना खेळवला गेला. या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. शफाली वर्मा, दीप्ती शर्मा भारताच्या या विजयाच्या हिरो ठरल्या. टीम इंडियाने जेतेपद पटकावल्यानंतर केलेल्या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि भारताने २९८ धावांचा डोंगर उभारला. टीम इंडियाकडून शफाली वर्मा व स्मृती मानधना यांनी १०४ धावांची भागीदारी रचत भारताच्या या धावसंख्येचा पाया रचला. शफाली वर्माने ८७ धावांची खेळी करत २ विकेट्सही घेतल्या. तर दीप्ती शर्माने ५ विकेट्स घेत नाबाद अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांवर सर्वबाद झाला.
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्याकडून विश्वचषकाची ट्रॉफी स्वीकारली. हरमनप्रीतने ट्रॉफी स्वीकारताना जय शाह यांच्या पाया पडली. यानंतर हल्ली कोणत्याही स्पर्धेचं जेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्माने टी-२० वर्ल्डकप २०२४ व लिओनेल मेस्सी फिफा वर्ल्डकप जेतेपद पटकावल्यानंतर ट्रॉफीसह केलेलं सेलिब्रेशन केलं. पण हरमन भांगडा करत ट्रॉफी स्वीकारण्यासाठी गेली आणि संघासह तिने हटके सेलिब्रेशन केलं आहे.
हरमनप्रीतने ट्रॉफी स्वीकारली व संपूर्ण संघ स्टेजवर आला. तितक्यात हरमन त्यांच्या दिशेने ट्रॉफी नेते आणि मागे घेते. असं ३ वेळा केल्यानंतर संपूर्ण संघ एकत्र आला आणि हरमनने ट्रॉफी हवेत उंचावली. ट्रॉफीसह सेलिब्रेशन केल्यानंतर चॅम्पियन लिहिलेल्या बोर्डसमोर फोटो काढण्यासाठी संपूर्ण संघ गोळा झालेला असताना व्हीलचेअरवर असलेल्या प्रतिका रावललाही सर्वांनी फोटोमध्ये घेतलं.
भारतीय संघ संपूर्ण सपोर्ट व कोचिंग स्टाफबरोबर फोटो काढत असताना भारताचे कोच अमोल मुझुमदार हातात भारताचा तिरंगा घेत अभिमानाने फडकावताना दिसले. तर जेमिमा रॉड्रीग्जने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये मैदानावर झोपत या वर्ल्ड चॅम्पियन संघातील खेळाडूंसह सेल्फी काढला. भारताने कोणतीही द्विपक्षीय मालिका जिंकली की जेमिमा असा सेल्फी घेते, तिचा प्रथाने तिने इथेही कायम ठेवली आहे.
