Harmanpreet Kaur’s World Cup Trophy Tattoo: भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिलाच एकदिवसीय विश्वचषक आपल्या नावे केला आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ५२ धावांनी सामना जिंकला आणि इतिहास घडवला. तब्बल २५ वर्षांनंतर महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे संघ सोडून इतर संघाने जेतेपद आपल्या नावे केलं. भारतीय संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर हरमनने खास टॅटू काढला आहे.

हरमनप्रीत कौरने संपूर्ण स्पर्धेत संघाचं उत्कृष्ट नेतृत्त्व केलं. अंतिम सामन्यातही हरमनने गोलंदाजांना उत्कृष्ट रितीने वापरत संघाला विजयाकडे नेलं. सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे संघाला विकेटची गरज असताना हरमनने गोलंदाजांचे पर्याय तपासून पाहिले, पण विकेट मिळत नव्हती. यादरम्यान हरमनने एक मोठा डाव खेळला आणि तिने पार्ट टाईम गोलंदाज शफाली वर्माला गोलंदाजी दिली.

हरमनप्रीतचा हा निर्णय सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. हरमनने शफाली वर्माला गोलंदाजी दिली आणि तिने दोन षटकांत दोन मोठे विकेट घेतले. सुरूवातीला तिने सुने लुसला झेलबाद केलं तर दुसऱ्या षटकात मारिझन कापला झेलबाद करवत दुसरी सर्वात मोठी विकेट मिळवून दिली. यानंतर हरमनने दीप्ती शर्माच्या चेंडूवर एक कमालीचा झेल टिपला आणि तिथेच दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वबाद झाला आणि भारत विश्वविजेता ठरला.

हरमनप्रीत कौरने या सामन्यानंतर एक खास टॅटू काढला आहे. हरमनने डाव्या हातावर वर्ल्डकप ट्रॉफी असलेला टॅटू काढला आहे आणि २०२५ आकडा लिहिला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे, “माझ्या हृदयावर आणि हातावर कायमचं कोरला गेला क्षण. पहिल्या दिवसापासून तुझी वाट पाहत होते आणि आता दररोज तुला पाहून कृतज्ञ राहीन,” असं तिनं तिच्या नव्या टॅटूच्या फोटोला कॅप्शन दिलं.

काय आहे हरमनप्रीत कौरच्या टॅटूवरील ५२ आकड्यामागचं रहस्य?

हरमनप्रीत कौरच्या या टॅटूमध्ये २०२५ शिवाय ५२ आकडाही तिच्या टॅटूमध्ये लिहिला आहे. दुसरा आकडा महिला विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने ५२ धावांनी विजय मिळवला आहे यासंबंधित असू शकतो. याशिवाय हा महिला विश्वचषकाचा ५२ वा सीझन होता, जो भारताने जिंकला. महिला विश्वचषकाला १९७३ मध्ये सुरूवात झाली होती.

लहानपणी वर्ल्डकप जिंकण्याचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण केल्यानंतर, भारतीय कर्णधाराने पुढच्या पिढीसाठी एक प्रेरणा देणारा मेसेजही दिला. हरमन म्हणाली, “स्वप्न पाहणं कधीच थांबवू नका. तुमचं नशीब तुम्हाला कुठे घेऊन जाईल, हे कुणालाच माहीत नसतं.”