Srilanka vs Bangladesh 1st ODI: कसोटी मालिका झाल्यानंतर आता श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पहिल्या वनडे सामन्याचा थरार सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्याचा थरार रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना कोलंबोत सुरू आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यात आयसीसीने लागू केलेल्या नव्या नियमांचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे.
वनडे क्रिकेटच्या नियमानुसार, दोन्ही बाजूने दोन चेंडूंचा वापर केला जायचा. २०११ मध्ये हा नियम लागू करण्यात आला होता. त्यामुळे चेंडू जुना होण्याचं प्रमाण खूप कमी होतं. पण आता आयसीसीने लागू केलेल्या नव्या नियमानुसार, ३४ व्या षटकापासून केवळ एक चेंडूचा वापर केला जाणार आहे. हा नियम श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात पहिल्यांदाच लागू करण्यात आला आहे.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेला सामना ऐतिहासिक ठरला आहे. कारण आयसीसीने नव्या नियमांची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच हा नियम लागू केला गेला आहे. दरम्यान पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेला श्रीलंकेचा संपूर्ण डाव अवघ्या २४४ धावांवर आटोपला आहे. या नव्या नियमांचा गोलंदाजांना चांगलाच फायदा होणार आहे. कारण चेंडू जुना झाल्यानंतर रिव्हर्स स्विंग होण्याचं प्रमाण वाढतं. ज्या गोलंदाजाकडे चेंडूला रिव्हर्स स्विंग करण्याची कला आहे. तो गोलंदाज फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो. मात्र, या नियमामुळे खालच्या फळीतील फलंदाजांंचं टेन्शन वाढणार आहे. कारण जुन्या चेंडूवर फलंदाजी करणं कठीण जातं. या नियमाचा गोलंदाज कसा फायदा घेतील हे पाहणं फायदेशीर ठरणार आहे.
श्रीलंकेचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना चरीथ असलंकाने १२३ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक १०६ धावांची खेळी केली. सलामीला आलेले पथुम निसंका आणि निशान मधुष्का स्वस्तात माघारी परतले. निसंका शून्यावर तर मधुष्का अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कुसल मेंडिसने ४३ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी केली. कुसल मेंडिस शून्यावर माघारी परतला. जनिथ लियांगेने २९ धावांचे योगदान दिले. तर मिलन रथनायकेने २२ धावांची खेळी केली.
बांगलादेशकडून गोलंदाजी करताना तस्किन अहमदने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर तंझिम साकिबने ३ गडी बाद केले. यासह तन्विर इस्लाम आणि नजमुल शांतोने १ गडी बाद केला. श्रीलंकेचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला.