आशिया चषक २०२५ चे जेतेपद भारतीय संघाने पटकावलं. पण विजेत्या भारतीय संघाला मात्र अद्याप या स्पर्धेची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. आशिया चषक स्पर्धा वादांमुळे सर्वात चर्चेत राहिली आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये काही ना काही वाद पाहायला मिळाले. या वादांवर आता आयसीसीने सुनावणी दिली असून हारिस रौफवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

आशिया चषक २०२५मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने खेळवले गेले आणि या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली. या तिन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये काही ना काही वाद झाला. आता पहिल्यांदाच आयसीसीने या प्रकरणावर आपला निर्णय दिला आहे. १४ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यांसाठी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरिस रौफला आयसीसीने ही शिक्षा सुनावली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या दोन सामन्यांमधील त्यांच्या वागणुकीबाबत त्याला २-२ दोन डिमेरिट गुण दिले आहेत. म्हणजेच एकूण ४ डिमेरिट गुण झाले आहेत. परिणामी, हारिसला २४ महिन्यांच्या कालावधीत चार डिमेरिट गुण मिळाल्याने त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. हारिस आता पाकिस्तान संघाच्या पुढील दोन सामन्यांसाठी पाकिस्तान संघाबाहेर राहणार आहे.

१४ सप्टेंबरच्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी सूर्यकुमार यादवला ३०% दंड ठोठावण्यात आला आहे. सूर्याला आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२१ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला आणि त्याच्या सामना शुल्काच्या ३० टक्के दंड आणि दोन डिमेरिट गुण देण्यात आले. याच कलमाअंतर्गत पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानलाही दंड ठोठावण्यात आला आहे.

जसप्रीत बुमराहवर ICCची दंडात्मक कारवाई

२८ सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन खेळाडूंवर आरोप करण्यात आले. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर कलम २.२१ अंतर्गत आरोप करण्यात आला आणि त्याला अधिकृतपणे इशारा देत दोषी आढळल्याबद्दल एक डिमेरिट गुण मिळाला. त्याने शिक्षा मान्य केली, त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती.

दरम्यान, हरिस रौफ पुन्हा एकदा त्याच कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. रिची रिचर्डसन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत, त्याला त्याच्या सामना शुल्काच्या ३० टक्के दंड आणि दोन अतिरिक्त डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले आणि अशारितीने त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली. यासह तो पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन वनडे सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही.

अर्शदीप सिंगबाबत ICCने काय घेतला निर्णय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर ४ स्टेजचा सामना २१ सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. या सामन्याबाबतची सुनावणी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी केली. यासाठी, भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर कलम २.६ अंतर्गत आरोप लावण्यात आला, जो अश्लील किंवा आक्षेपार्ह हावभावांशी संबंधित आहे. पण, चौकशीनंतर तो निर्दोष आढळला आणि त्यामुळे त्याला कोणतीही शिक्षा देण्यात आली नाही.