ICC CEO Geoff Allardice steps down : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) मोठा गदारोळ झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ज्योफ एलार्डिस यांच्या राजीनाम्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काही आठवडे आधी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. एका बोर्ड सदस्याने सूचित केले की यजमान पाकिस्तानच्या तयारीचे स्पष्ट चित्र सादर करण्यात त्यांचे अपयश हे या निर्णयामागील अनेक कारणांपैकी एक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम केल्यानंतर ५७ वर्षीय ज्योफ एलार्डिस २०१२ मध्ये क्रिकेटचे महाव्यवस्थापक म्हणून आयसीसी मध्ये सामील झाले. आठ महिने कार्यकारी सीईओ म्हणून काम केल्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांची आयसीसीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली.

ज्योफ एलार्डिस काय म्हणाले?

ज्योफ एलार्डिस काय म्हणाले, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणे हा एक विशेषाधिकार आहे. क्रिकेटचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यात आम्ही यशस्वी झाल्याचा अभिमान आहे. गेल्या १३ वर्षांतील समर्थन आणि सहकार्याबद्दल मी आयसीसी अध्यक्ष, संचालक मंडळ आणि संपूर्ण क्रिकेट समुदायाचे आभार मानू इच्छितो. मला विश्वास आहे की पद सोडण्याची आणि नवीन आव्हानांना तोंड देण्याची हीच योग्य वेळ आहे. क्रिकेटसाठी पुढे रोमांचक काळ आहे आणि मी आयसीसी आणि जागतिक क्रिकेट समुदायाला भविष्यात प्रत्येक यशासाठी शुभेच्छा देतो.”

ज्योफ एलार्डिसने राजीनामा का दिला?

आयसीसीच्या अधिकृत निवेदनात ज्योफ एलार्डिसच्या पायउतार नेमके कारण नमूद केलेले नाही, परंतु एका उच्च सूत्राने सांगितले की हा विकास काही काळापासून होत आहे. बोर्ड सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “अमेरिकेतील आयसीसी टी-२० विश्वचषक खेळण्याच्या परिस्थितीच्या बाबतीत अत्यंत अयशस्वी ठरला आणि बजेटचा खूप जास्त खर्च झाला आहे. त्याचे अजूनही ऑडिट केले जात आहे. सर्वात मोठी समस्या चॅम्पियन्स ट्रॉफीची होती, जिथे सीईओ या नात्याने पाकिस्तान एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यास तयार असल्याचे स्पष्ट चित्र त्यांनी सादर करणे अपेक्षित होते. मात्र, त्यात ते अपयशी ठरले.”

पाकिस्तानमधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीवर प्रश्न –

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. त्यामुळे भारताचे सर्वा सामने दुबईत होणार आहेत. आयसीसीसाठी एक मोठी चिंतेची बाब म्हणजे कराची आणि रावळपिंडी येथील स्पर्धेची ठिकाणे अजूनही अर्धवट बांधकाम किंवा नूतनीकरणाधीन आहेत. तिथून पुढे आलेली फोटो फारसे सकारात्मक नाहीत.

काय म्हणाले जय शहा?

२०१७ नंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जगातील अव्वल आठ संघांचा समावेश असलेल्या या मोठ्या स्पर्धेसाठी पाकिस्तानात वेळेत तयारी पूर्ण होईल की नाही हे पाहणे बाकी आहे. तथापि, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी त्यांच्या योगदानाबद्दल ज्योफ एलार्डिस कौतुक केले. ते म्हणाले, “आयसीसी बोर्डाच्या वतीने, मी ज्योफ यांचे त्यांच्या कार्यकाळातील नेतृत्व आणि वचनबद्धतेबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो. क्रिकेटला जागतिक स्तरावर पुढे नेण्यात त्यांच्या प्रयत्नांची भूमिका महत्त्वाची आहे. आम्ही त्यांच्या सेवेबद्दल खरोखर कृतज्ञ आहोत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc ceo geoff allardice to step down ahead of champions trophy 2025 vbm