Sachin Tendulkar on Afgainstan Semi Final Bound: अफगाणिस्तानने टी-२० विश्वचषकाच्या सुपर८ सामन्यात बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. अफगाणिस्तानचा संघ प्रथमच उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशवर ८ धावांनी थरारक विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानचा विजय आणि त्यांची विश्वचषकातील कामगिरी पाहिल्यानंतर माजी दिग्गज सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे. सचिनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली.

सचिन तेंडुलकरने अफगाणिस्तानसाठी केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. टी-२० वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानने गट सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून मोठा अपसेट केला होता. यानंतर अफगाणिस्तानने सुपर८ फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघाला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली. आता बांगलादेशचा पराभव करून संघाने उपांत्य फेरी गाठली. इतकेच नव्हे तर अफगाणिस्तानच्या बांगलादेशवरील विजयाने ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला.

हेही वाचा – AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनने अफगाणिस्तानचा विजय हा त्यांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा पुरावा असल्याचे म्हटले. सचिनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “अफगाणिस्तान तुमचा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांना पराभूत करून उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अतुलनीय आहे. आजचा विजय तुमच्या मेहनतीचा आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे. तुम्ही केलेल्या या प्रगतीचा मला खूप अभिमान आहे. असंच खेळत राहा.”

हेही वाचा – IND v AUS: “आम्ही ऑस्ट्रेलियाला ओळखून आहोत…” भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला “आम्हाला जे करायचं होतं”

अफगाणिस्तानकडून रशीद खान आणि नवीन उल हकने प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. नवीन उल हकला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला. नवीनने एकाच षटकात शेवटच्या दोन विकेट घेत अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत नेले.

हेही वाचा – T20 WC 2024 मधील टॉप ४ संघ ठरले, उपांत्य फेरीचे सामने कधी, कुठे आणि केव्हा खेळवले जाणार? पाहा वेळापत्रक

आता उपांत्य फेरीत २७ जून रोजी अफगाणिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. अफगाणिस्तानचा संघ उत्कृष्ट फॉर्मात आहे, त्यांचे सलामीवीर आणि फलंदाजी फळीही चांगली कामगिरी करत आहे. तर अफगाणिस्तानचे गोलंदाजी युनिट तर उत्कृष्ट फॉर्मात आहेत. अफगाणिस्तानचा संघ पुढील सामन्यातही अशीच कामगिरी करत राहिल, अशी चाहत्यांनाही अपेक्षा आहे.