Saurabh Netravalkar Exclusive Interview: अमेरिकेच्या संघातून टी २० विश्वचषक खेळणाऱ्या भारतीय सौरभ नेत्रावळकरचं नाव मागील काही काळातच जरी चर्चेत आलं असलं तरी सौरभ आणि क्रिकेटचं नातं तसं खूप जुनं आहे. २०१० मध्ये त्याने अंडर-19 विश्वचषकासाठी त्याने भारतीय संघात स्थान मिळवलं होतं. त्यावेळेस आई किंवा बाबांना घेऊन तो मुंबई लोकलमधून चर्चगेटपर्यंत रोज क्रिकेटच्या सरावासाठी जायचा. मुंबईतील या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने भारताकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न मागे ठेवून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय घेण्याआधी काय घडलं याचा एक किस्सा आता त्याने स्वतः शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आई वडिलांकडे मागितली दोन वर्षं

तर झालं असं की, केएल राहुल, मयंक अग्रवालसारख्या क्रिकेटपटूंसह अंडर-१९ वर्ल्डकप खेळलेल्या सौरभने कॉर्नेल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स करण्यासाठी हा खेळ सोडण्याचा कठोर निर्णय घेतला. पण त्याआधी त्याच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये अनेक वळणं आली होती. सौरभ हा सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होताच तसेच त्याच्या गाठीशी क्रिकेट खेळण्याचं कौशल्य सुद्धा होतं. अभ्यास की क्रिकेट अशी निवड करण्याआधी त्याने आपल्या पालकांकडे दोन वर्षांचा अवधी मागितला होता, जर दोन वर्षात त्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केलं नाही तर तो अभ्यास व कामावरच लक्ष देईल असे त्याने ठरवले होते.

रंगांधळा ठरलो आणि..

झहीर खान, अजित आगरकर, आविष्कार साळवी आणि धवल कुलकर्णी या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे त्याला मुंबई रणजी संघात स्थान मिळू शकले नाही, तेव्हा नेत्रावळकरला समजले की आता आपल्याला क्रिकेट सोडून कामावर लक्ष देण्याची गरज आहे. पण तिथे सुद्धा एक मोठी अडचण आली. सौरभ सांगतो की, “अंडर १९ विश्वचषकानंतर मला बीपीसीएलमध्ये नोकरीची ऑफर देण्यात आली जिथे त्यांनी मला विविध चाचण्या घेण्यास सांगितले. त्यापैकी एक डोळ्यांसाठी चाचणी होती. जिथे ते स्क्रीनवर विविध रंग दाखवतात व आपल्याला ते ओळखायला सांगितले जातात. त्या चाचणीच्या अहवालात त्यांनी मला मी रंगांधळा आहे असं सांगितलं होतं. शेवटी २०१६ मध्ये शिष्यवृत्ती मिळाल्यावर मी मास्टर्स करण्यासाठी अमेरिकेला जाण्याचं ठरवलं.”

सौरभ नेत्रावळकर कशी जपतो क्रिकेटची आवड?

अमेरिकेत गेल्यावर नेत्रावळकरने आपली क्रिकेटची आवड जोपासायचं ठरवलं. तो आठवड्यातून तीन दिवस त्याच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या प्रशस्त जिममध्ये व्यायाम करतो. इनडोअर मैदानात सराव करतो. सौरभ सांगतो की, “मी संध्याकाळी काम संपल्यावर सहज म्हणून मित्रांसह फिरायला जात नाही उलट सरावासाठी जातो. क्लबचे सामने वीकेंडला खेळले जातात, त्यामुळे बऱ्याच वेळा, मी शुक्रवारी ऑफिसनंतर फ्लाइट पकडून हे सामने खेळण्यासाठी गेलो आहे आणि सोमवारी ऑफिस पुन्हा जॉईन केले आहे. माझे काम चांगले चालले आहे आणि माझ्या कंपनीने मी केलेले प्रामाणिक प्रयत्न पाहिले आहेत, क्रिकेट माझ्या कामाच्या आड येत नाही.”

हे ही वाचा<< सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”

यूएसमध्ये अनेक जण अभ्यासासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी येतात पण इथे आल्यावर त्यांनाही आपल्याप्रमाणे काम व आवडी जपण्याचा मार्ग मिळावा अशी इच्छा सुद्धा सौरभने व्यक्त केली. जर माझ्यामुळे इतरांना आव्हानाचा सामना करण्याची प्रेरणा मिळाली तर मला खूप आवडेल असंही नेत्रावळकरने इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना सांगितलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saurabh netravalkar called colour blind by bpcl why usa star netravalkar left india after not getting selected in mumbai ranji team after u19 wold cup svs