Sana Mir Statement On Azad Kashmir: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत गुरूवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात समालोचन करत असलेल्या पाकिस्तानची माजी कर्णधार सना मीरने वादग्रस्त वक्तव्य केलं. समालोचन करत असताना पाकिस्तानची फलंदाज नतालिया परवेजबद्दल बोलताना तिने ‘आझाद काश्मीर’चा उल्लेख केला. तिने हे वक्तव्य लाईव्ह समालोचनादरम्यान केलं. त्यामुळे तिच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. क्रिकेटचं समालोचन करत असताना असं वक्तव्य केल्याने तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. यासह आयसीसीने तिच्यावर कठोर कारवाई करावी, अशी देखील मागणी केली जात आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या.
आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान खेळाडूंमध्ये बरंच काही घडलं होतं. भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास नकार दिला होता. त्यानंतर साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर बॅटने वादग्रस्त इशारा केला होता. हरिस रौफने ०-६ चा इशारा केला होता. यावर भारतीय खेळाडूंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
नेमकं काय घडलं?
पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये महिला वर्ल्डकप स्पर्धेतील सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी सुरू होती. त्यावेळी २९ व्या षटकात पाकिस्तानची फलंदाज नतालिया परवेज फलंदाजीला आली. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी येतो, त्यावेळी समालोचक खेळाडूंची ओळख करून देतात. पण नतालिया परवेजची ओळख सांगताना,सना मीरने ही काश्मीरची रहिवाशी आहे, असं सांगितलं. पण हे म्हणाल्यानंतर तिने लगेचच ती स्वतंत्र काश्मीरची रहिवाशी असल्याचं सांगितलं. काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचा पोकळ दावा पाकिस्तानकडून केला जातो. यावरून राजकीय पातळीवर वाद सुरू आहेत. पण क्रिकेटच्या मैदानावर स्वतंत्र काश्मीरबद्दल वक्तव्य करणं हा राजकीय अजेंडा असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे तिच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला आहे. येत्या ५ ऑक्टोबरला भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
सना मीरने दिलं स्पष्टीकरण
सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच रंगल्यानंतर सना मीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून स्पष्टीकरण दिलं आहे. तिने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करते लिहिले की, ‘मी जे काही म्हणाले, ते वाढवून सांगितलं जात आहे. हे खूप दुर्देवी आहे. माझ्या बोलण्याचा हेतू फक्त एका खेळाडूची पार्श्वभूमी आणि तिचा संघर्षमय प्रवास सांगण्याचा होता. महिला वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान मी ज्या खेळाडूचा उल्लेख केला, ती खेळाडू पाकिस्तानच्या एका विशिष्ट प्रदेशातून येते आणि माझा हेतू केवळ तिचा प्रवास सांगणं इतकाच होता. समालोचन करताना समालोचक खेळाडूंचा प्रवास सांगत असतात. त्याचप्रमाणे मी देखील उल्लेख केला.” सना मीरने केलेल्या या वक्तव्यानंतर आता सना मीरवर आयसीसीकडून कारवाईची मागणी केली जात आहे. आता आयसीसी काय कारवाई करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.