धरमशाला : आत्मविश्वास दुणावलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा सामना विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा प्रयत्न आपली विजयी लय कायम राखण्याचा असेल. यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभूत झाल्यानंतर सलग तीन विजय मिळवत ऑस्ट्रेलियन संघाने पुनरागमन केले. गेल्या सामन्यात नेदरलँड्सवर ३०९ धावांनी विजय साकारात विश्वचषकातील सर्वात मोठा विजय त्यांनी नोंदवला. पाच जेतेपदे मिळवणारा ऑस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.
हेही वाचा >>> तिरंदाज शीतलला दोन सुवर्णपदके; पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंत ९९ पदके
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ विजय नोंदवत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंड जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. मात्र, द्विपक्षीय एकदिवसीय व विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांची कामगिरी चांगली राहिलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी ११ पैकी केवळ तीनच सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला सहा वर्षांपूर्वी २०१७ मध्ये पराभूत केले होते. ऑस्ट्रेलियाने गेल्या सामन्यात ८ बाद ३९९ धावा केल्या होत्या, ही विश्वचषकातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर (३३२ धावा) आघाडीच्या तीन खेळाडूंमध्ये आहे. मध्यक्रमात स्टीव्ह स्मिथ व मार्नस लबूशेन यांनी अर्धशतके झळकावली. ग्लेन मॅक्सवेलने केवळ ४० चेंडूंत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. मिचेल स्टार्क (सात बळी) गेल्या दोन सामन्यांत लयीत दिसला नाही. तर, जोश हेझलवूड व कर्णधार पॅट कमिन्स यांनाही म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही.
दुसरीकडे, न्यूझीलंडची विजयी लय भारताने रोखली. पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध नाबाद १५२ धावांची खेळी केल्यानंतर डेव्हॉन कॉन्वे (२४९ धावा) लयीत दिसला नाही. केन विल्यम्सन अंगठय़ाला झालेल्या दुखापतीतून सावरलेला दिसत नाही. मध्यक्रमात डॅरेल मिचेल (२६८ धावा) आणि रचिन रवींद्र (२९० धावा) यांनी चमक दाखवली आहे. गोलंदाजीत मॅट हेन्री (१० बळी) व लॉकी फग्र्युसन (आठ बळी) यांनी प्रभावित केले आहे, तर अनुभवी ट्रेंट बोल्टकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
’ वेळ : सकाळी १०.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, हॉटस्टार अॅप