वर्षांच्या पहिल्या तिमाहीत पराभवाची साडेसाती मागे लागलेल्या भारताने शुक्रवारी आपल्या दर्जाला आणि रुबाबाला साजेसा खेळ करीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर आरामात केली. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत विजयाची बोहनी करताना भारताने दोन्ही विश्वचषकांच्या इतिहासातील पाकिस्तानविरुद्ध अराजित राहण्याची आपली परंपरा कायम राखली. लेग-स्पिनर अमित मिश्राची फिरकी आणि विराट कोहली, सुरेश रैना यांची फटकेबाजी यामुळे भारताला ७ विकेट राखून हा विजय मिळवता आला. काही दिवसांपूर्वी बांगलादेशच्याच भूमीवरील याच मैदानावर शाहीद आफ्रिदीने अखेरच्या षटकात दाखवलेल्या पराक्रमामुळे पाकिस्तानने भारतावर आश्चर्यकारक विजय संपादन केला होता. त्या पराभवाची भारताने सव्याज परतफेड केली.
शेर-ए-बांगला स्टेडियमवर झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला शुक्रवारी अपेक्षेप्रमाणेच हाऊसफुल्ल गर्दी लाभली होती. भारतीय फिरकी गोलंदाजांनी पाकिस्तानला ७ बाद १३० धावसंख्येवर रोखण्याची किमया साधली. त्यानंतर भारतीय फलंदाजांनीही आत्मविश्वासाने प्रतिहल्ला चढवला आणि नऊ चेंडू शिल्लक असतानाच भारताचया विजयावर शिक्कामोर्तब केले. ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध आपला चौथा विजय नोंदवला. पाकिस्तानची धावसंख्या गाठण्यात विराट कोहली (नाबाद ३६) आणि सुरेश रैना (नाबाद ३५) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची अभेद्य भागीदारी रचली. कोहलीने ३२ चेंडूंत, तर रैनाने २८ चेंडूंत आपापल्या खेळी साकारताना प्रत्येकी चार चौकार आणि एका षटकार खेचले.
शुक्रवारी नाणेफेकीपासून अखेपर्यंत सारे काही धोनीकरिता अनुकूल घडत गेले. गोलंदाजी, फलंदाजी आणि व्यूहरचना या प्रत्येक विभागात भारतीय संघ वरचढ ठरला. पहिल्या तीन षटकांमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनीही टिच्चून मारा केला. परंतु त्यानंतर रोहित शर्माने (२४) जुनैद खानवर हल्ला चढवत १२ धावा वसूल केल्या. शॉर्ट फाइन लेगला चौकार आणि पॉइंटच्या डोक्यावरून षटकार ठोकला.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : २० षटकांत ७ बाद १३० (अहमद शेहझाद २२, उमर अकमल ३३, सोहेब मकसूद २०; अमित मिश्रा २/२२) पराभूत वि. भारत : १८.३ षटकांत ३ बाद १३१ (रोहित शर्मा २४, शिखर धवन ३०, विराट कोहली नाबाद ३६, सुरेश रैना नाबाद ३५; सईद अजमल १/१८)
सामनावीर : अमित मिश्रा.