पॅरिस : अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्वीऑटेकने आपले वर्चस्व कायम राखताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पाच वर्षांत चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. गुरुवारी उपांत्य फेरीच्या लढतीत श्वीऑटेकने तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या कोको गॉफला ६-२, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. फ्रेंच स्पर्धेतील हा तिचा सलग २०वा विजय ठरला.
गतवर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणाऱ्या गॉफला श्वीऑटेकसमोर फारसे आव्हान उपस्थित करता आले नाही. श्वीऑटेकने सामन्याची दमदार सुरुवात करताना पहिल्याच गेममध्ये गॉफची सव्र्हिस तोडली. त्यानंतर आपली सव्र्हिस राखताना तिने ३-१ अशी आघाडी घेतली. मग पुन्हा गॉफची सव्र्हिस तोडत श्वीऑटेकने सेटवरील पकड अधिकच घट्ट केली. यानंतर गॉफला पुनरागमन करता आले नाही आणि श्वीऑटेकने पहिला सेट सहज जिंकला.
हेही वाचा >>>Pak vs USA: पाकिस्तानचं पानिपत; सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेकडून पराभवाची नामुष्की
दुसऱ्या सेटमध्ये गॉफने सुरुवात चांगली केली होती. तिने चौथ्या गेममध्ये श्वीऑटेकची सव्र्हिस तोडताना ३-१ अशी भक्कम आघाडी घेतली. मात्र, श्वीऑटेकने ‘लाल माती’च्या कोर्टवर खेळताना आपले वेगळेपण पुन्हा सिद्ध केले. तिने पुढील तीन गेममध्ये गॉफची सव्र्हिस दोन वेळा मोडताना आणि आपली सव्र्हिस राखताना ४-३ अशी आघाडी मिळवली. यानंतर आपला चांगला खेळ सुरू ठेवत श्वीऑटेकने दुसरा सेट ६-४ असा जिंकत फ्रेंच स्पर्धेतील सलग तिसऱ्या जेतेपदाच्या आशा कायम राखल्या.
झ्वेरेवची आगेकूच
जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेवने अॅलेक्स डी मिनौरचा ६-४, ७-६ (७-५), ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करताना फ्रेंच खुल्या स्पर्धेत पुरुष एकेरीची सलग चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठली.
बोपण्णा-एब्डेन जोडी गारद
भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डेन या दुसऱ्या मानांकित जोडीचे फ्रेंच खुल्या स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. बोपण्णा-एब्डेन जोडीला इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रेया वावासोरी जोडीने
५-७, ६-२, २-६ असे पराभूत केले.
