मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंगमध्ये झालेल्या Playoffs च्या पहिल्या सामन्यात (Qualifier 1) मुंबईने चेन्नईवर सहा गडी राखुन विजय मिळवला. या विजयासह मुंबई IPL 2019 च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच पटकावणाऱ्या सुर्य कुमार यादवने विशेष कामगिरी बजावली. त्याच्या संयमी फलंदाजीमुळे मुंबईला चेन्नईचा पराभव करता आला. या सामन्यात मुंबईचे खेळाडू चमकले असले तरी चेन्नई संघातून खेळणाऱ्या इम्रान ताहिरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने ट्वेंटी-२०क्रिकेटमध्ये ३०० बळी घेण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम करणारा तो जगातील सातवा गोलंदाज ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी झालेल्या सामन्यात इम्रान ताहिरने उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करत ईशान किशन व कृणाल पांड्या या दोघांना माघारी धाडले. त्याने चार षटकांमध्ये ३३ धावा देऊन २ बळी टिपले. कृणाल पांड्याला बाद करून इम्रान ताहिरने ३०० बळी घेण्याचा विक्रम केला. ३०० बळी घेणारा तो जगातील सातवा गोलंदाज ठरला आहे. या यादीत पहिल्या स्थानी ४८८ बळींसह ड्वेन ब्राव्हो आहे. तर दुसऱ्या स्थानी ३७७ बळींसह लसिथ मलिंगा आहे त्यानंतर अनुक्रमे सुनील नरेन- ३७० बळी, शाकिब अल हसन – ३४६ बळी, शाहिद आफ्रीदी- ३३३ बळी, सोहेल तन्विर ३२६ बळी हे गोलंदाज आहेत. या सात गोलंदाजांमधील पहिले दोन वेगवान गोलंदाज आहेत. आणि त्यानंतरचे चारही फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे इम्रान ताहिर हा ३०० बळी घेणारा जगातील चौथा फिरकी गोलंदाज झाला आहे, असेही म्हणता येईल.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंगमध्ये झालेल्या Playoffs च्या पहिल्या सामन्यात (Qualifier 1) मुंबईने चेन्नईला ६ गडी राखून सहज पराभूत केले. १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतकी खेळी केली. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. चेन्नईला शुक्रवारी अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर चौकार लगावणारा रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर पायचीत झाला. मैदानावरील पंचांनी त्याला बाद ठरवल्यामुळे रोहितने DRS ची मदत मागितली. त्यात तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांच्या निर्णयालाच दुजोरा दिला. त्यामुळे रोहितला ४ धावांवर माघारी परतावे लागले. स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा क्विंटन डी कॉकही स्वस्तात बाद झाला. २ चौकारांच्या मदतीने ८ धावा करून तो माघारी परतला. हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. मुंबईने दोन गडी स्वस्तात गमावल्यानंतर सूर्यकुमार यादवने संयमी खेळी करत दमदार अर्धशतक ठोकले. त्याने ईशान किशन बरोबर अर्धशतकी भागीदारीदेखील केली. त्यानंतर आधी खेळपट्टीवर स्थिरावलेला ईशान किशन आणि पाठोपाठ पहिल्याच चेंडूवर कृणाल पांड्या असे २ चेंडूत इम्रान ताहिरने २ बळी टिपले. ईशान किशनने २८ धावा केल्या. पण सूर्यकुमारने नाबाद ७१ धावा करून मुंबईला विजय मिळवून दिला.

त्याआधी सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. चेन्नईच्या डावाची सुरुवात खराब झाली. एक जीवनदान मिळाल्यानंतर त्या संधीचा फायदा डु प्लेसिसला घेता आला नाही. तो एका चौकारासह ६ धावा करून माघारी परतला. चांगल्या लयीत असलेला सुरेश रैना स्वस्तात बाद झाला. षटकात आधीच फ्री हिटवर चौकार मिळाल्यानंतर आणखी एक मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि तो जयंत यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर शेन वॉटसनने संयमी सुरुवात केली, पण नंतर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तो देखील मोठा फटका खेळून बाद झाला. जयंत यादवने उलट धावत जाऊन त्याचा अप्रतिम झेल टिपला. केदार जाधव दुखापतग्रस्त असल्याने संधी मिळालेला मुरली विजय चांगली सुरुवात केल्यानंतर यष्टिचीत झाला. मुरली विजयला काही कळण्याआधीच यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने यष्ट्या उडवून त्याला माघारी धाडले. मुरली विजयने २६ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. अखेर अंबाती रायडू आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यान दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि चेन्नईला १३१ धावांपर्यंत मजल मारून दिली. रायडूने नाबाद ४२ तर महेंद्रसिंग धोनीने नाबाद ३७ धावा केल्या.

या सामन्यासाठी दोनही संघांनी १-१ बदल केले होते. मुंबईने डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनेघन याला वगळून त्याच्या जागी फिरकीपटू जयंत यादवला संधी दिली होती. तर चेन्नईच्या केदार जाधवला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली असून त्या जागी मुरली विजयला संघात स्थान देण्यात आले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imran tahir becomes seventh bowler to complete 300 t20 wickets