भारतीय संघाने ओमानला पराभूत करत आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२५ सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. हर्ष दुबेच्या कमालीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारत अ संघाने ६ विकेट्सने हा विजय निश्चित केला. आशिया चषक रायझिंग स्टार्सच्या ब गटातील हा अखेरचा सामना सेमीफायनलच्या दृष्टीने भारताला जिंकणं महत्त्वाचं होतं आणि संघाने अष्टपैलू कामगिरी करत हा सामना जिंकला.
ओमान संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघाने गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करत ओमान संघाला १३५ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. तर प्रत्युत्तरात भारत अ संघाने हर्ष दुबेसह भारताच्या इतर फलंदाजांच्या मदतीने हे लक्ष्य सहज गाठलं.
भारत अ संघाचा ओमानवर दणदणीत विजय व सेमीफायनलमध्ये मारली धडक
ओमानने दिलेल्या १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रियांश आर्य १० धावा तर वैभव सूर्यवंशी १२ धावा करत बाद झाले. यानंतर नमन धीरने पुन्हा एकदा प्रभावी खेळी करत संघाचा डाव सावरला. नमनने १९ चेंडूत २ चौकार-२ षटकारांसह ३० धावांची खेळी केली. तर नंतर अष्टपैलू हर्ष दुबेने उत्कृष्ट फलंदाजी करत भारतीय संघाला विजयापर्यंत नेलं. तर नेहाल वधेरानेही त्याला चांगली साथ दिली. हर्ष दुबेने ४१ चेंडूत त्याचं टी-२० क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक झळकावलं. भारत अ संघात जितेश शर्मा, रमणदीप सिंग, आशुतोष शर्मासारखे फलंदाज असतानाही हर्ष दुबेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला धाडलं आणि त्याने संघासाठी मॅचविनिंग खेळी केली.
अष्टपैलू हर्ष दुबेने ५५ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय हर्ष दुबे व नेहाल वधेरा यांनी ५५ चेंडूत ६६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली, ज्यामुळे संघाने विजयाचा पाया रचला. टीम इंडिया शुक्रवार २१ नोव्हेंबरला पहिला सेमीफायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ब गटातील सामने संपले असले तरी अ गटातील सामने शिल्लक असून सेमीफायनलचे दोन संघ अद्याप ठरलेले नाहीत.
तत्त्पूर्वी ओमानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १३५ धावाच करू शकला. ओमानकडून करण सोनावले १२ धावा करत बाद झाला. तर कर्णधार हमद मिर्झा याने ३२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर वसीम अली याने ३४ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर नारायण साईशिव १६ धावा करत बाद झाला. याशिवाय ओमानचे सर्व खेळाडू अपयशी ठरले आणि यामुळे संघाने भारताला विजयासाठी १३६ धावांचे आव्हान दिले.
भारताकडून गुर्जपनीत सिंग व सुयश शर्मा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर विजयकुमार वैशाक, हर्ष दुबे, नमन धीर यांनी प्रत्येक १-१ विकेट घेतल्या.
