IND vs AUS 3rd ODI Highlights: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जोडीने पुन्हा एकदा भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सामन्यात दणदणीत विजय मिळवून दिला आहे. रोहित-विराटने १६८ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने विजय मिळवून दिला. रोहित विराट शेवटपर्यंत नाबाद राहत त्यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ऑस्ट्रेलियाने २-१ च्या फरकाने भारताविरूद्धची वनडे मालिका आपल्या नावे केली. तर रोहित शर्मा या सामन्याचा सामनावीर आणि मालिकावीरही ठरला.
सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी ९ विकेट्सने पराभव केला, ज्यामध्ये रोहित शर्माने शानदार शतकासह आणि विराट कोहलीने दमदार अर्धशतकासह सर्वात मोठी भूमिका बजावली. दोघांनी मिळून १६८ धावांची भागीदारी करून संघाला २३७ धावांचं लक्ष्य सहज गाठण्यास मदत केली. वेगवान गोलंदाज हर्षित राणाने शानदार गोलंदाजी केली, चार विकेट घेतल्या.
रोहित शर्माने १२५ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १२१ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ८१ चेंडूत ७ चौकारांसह ७४ धावा केल्या. तर शुबमन गिल २६ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह २४ धावा करत बाद झाला. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २३७ धावांचे आव्हान दिले होते. रोहित-विराटच्या भागीदारीसह भारताने ३८.३ षटकांत २३७ धावा करत सहज विजय मिळवला.
या मालिकेच्या सुरुवातीपासूनच सर्वांचे लक्ष विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुनरागमनावर होते. प्रत्येक सामन्यातील त्यांची कामगिरी सर्वाधिक चर्चेचा विषय होती. परिणामी, मालिकेच्या निकालापेक्षा दोघांच्या फलंदाजीच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा होत्या. म्हणूनच, पहिल्या दोन सामन्यांमध्ये मालिकेचा निकाल लागला असला तरी, अंतिम सामना चाहत्यांसाठी महत्त्वाचा ठरला आणि सर्वात रोमांचक होता, कारण विराट आणि रोहितने खूप धावा केल्या आणि चाहत्यांची मनं जिंकली.
रोहित-विराटने फलंदाजीत सर्वांची मनं जिंकली. तर हर्षित राणाने ४ विकेट्स घेत दमदार कामगिरी केली. टीम इंडियामध्ये वनडे मालिकेसाठी निवड झाल्यानंतर हर्षित राणाला ट्रोल करण्यात आलं. या तरुण वेगवान गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांना झटपट माघारी धाडसं प्रचंड हल्ला चढवला.
ट्रॅव्हिस हेड आणि मिशेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली आणि त्यांनी ६१ धावा जोडल्या. मोहम्मद सिराजने ही भागीदारी मोडली आणि त्यानंतर अक्षर पटेलने फिरकीच्या जोरावर विकेट घेतली. त्यानंतर, मॅथ्यू शॉर्ट आणि मॅट रेनशॉ ऑस्ट्रेलियाच्या पुनरागमनाचे नेतृत्व करत असताना, हर्षित आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सलग धक्के दिले. यासह ऑस्ट्रेलिया संघ ४७ षटकांत फक्त २३७ धावांवर गारद झाला.
