India Beat Pakistan by 7 Wickets Asia Cup 2025: भारताने सूर्यकुमार यादवच्या विजयी षटकारासह पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे.. भारताच्या गोलंदाजांनी चांगली सुरूवात करत संघाच्या विजयाचा पाया रचला. तर फलंदाजीत टॉप-४ फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत पाकिस्तानला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. पाकिस्तानने दिलेल्या १२८ धावांचं लक्ष्य भारताने १५.५ षटकांत गाठत ७ विकेट्सने विजय मिळवला.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय मात्र भारताच्या पथ्यावर पडला. पाकिस्तानच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी फार धावा करण्याची संधी दिली. तर नाणेफेक गमावल्यानंतरही कर्णधार सूर्यकुमार निवांत होता, कारण भारताला प्रथम गोलंदाजीच करायची होती. भारताच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक आणि उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने शानदार कामगिरी केली.
पाकिस्तानने दिलेल्या १२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने पहिल्या दोन चेंडूवर चौकार, षटकार लगावत दणक्यात सुरूवात केली. अभिषेक शर्मा १३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३१ धावा करत बाद झाला. तर शुबमन गिल २ चौकार लगावत १० धावा करत माघारी परतला. यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने ५० अधिक धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. तिलक वर्मा ३१ धावा करत बाद झाला.
सूर्यकुमार यादवने कमालीची फटकेबाजी करत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. सूर्यकुमार यादवने ३७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावा करत नाबाद माघारी परतला. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने विजयी षटकार लगावला. सूर्यकुमार यादवचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी त्याने भारताच्या चाहत्यांना विजयाचं रिटर्न गिफ्ट दिलं आहे.
भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं
भारतीय संघाने नाणेफेक गमावली असली तरी सामन्यात दबदबा मात्र भारतीय संघाचा होता. भारतीय संघाने पहिल्याच षटकात विकेट घेत सामन्याला सुरूवात केली. हार्दिक पंड्याने गोलंदाजीला सुरूवात करत पहिला चेंडू वाईड टाकला आणि त्यानंतर पहिल्या लीगल चेंडूवर त्याने सईम अयुबला झेलबाद करवत पहिली विकेट मिळवली. सईम अयुब सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. तर बुमराहने पुढच्या षटकात मोहम्मद हारिसला झेलबाद केलं.
पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याने ४० धावांची खेळी केली. याशिवाय इतर फलंदाज फेल ठरले. फरहानसह फखर जमानने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या फिरकीपटूंपुढे फार कोणाच निभाव लागला नाही. अक्षर पटेलने झटपट दोन विकेट घेतले. तर कुलदीपच्या फिरकीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. त्याने सलग दोन विकेट्स घेत पाकिस्तानला धक्के दिले.
गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी वादळी फटकेबाजी करत ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आफ्रिदीने १६ चेंडूत ४ षटकारांसह ३३ धावा केल्या. तर सुफियान मुकीमने बुमराहविरूद्ध दोन चौकार मारले. पण बुमराहने त्याला क्लीन बोल्ड करत लगेच बदला घेतला. भारताकडून कुलदीपने ३ विकेट्स, अक्षर व बुमराहने २-२ विकेट्स तर हार्दिक व वरूणने १-१ विकेट्स घेतल्या.
भारताचं विजयानंतरही पाकिस्तानशी हस्तांदोलन नाहीच!
सूर्यकुमार यादवने दणदणीत षटकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यानंतर सूर्या थेट हेल्मेट काढून ड्रेसिंग रूमच्या दिशेने चालू लागला. यानंतर शिवम दुबेला थोडं पुढे गेल्यावर त्याने हात मिळवला. तर कोणताच भारतीय खेळाडू पाकिस्तान संघाबरोबर हात मिळवण्यासाठी पुढे मैदानात आला नाही. भारतीय संघातील खेळाडूंनीही पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून सामन्याव्यतिरिक्त कोणतेही मैत्रीपूर्ण संबंध संघातील खेळाडूंबरोबर ठेवले नाहीत.