आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आले होते. ट्रेव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत विश्वचषकावर नाव कोरलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर भारतीय संघाला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. रोहित शर्मा, मोहम्मद सिराज, विराट कोहलीला पराभव झाल्यानंतर अश्रू अनावर झाले. अभिनेत्री अनुष्का शर्मा, शेट्टी, रितिका सजदेह आणि खेळांडूच्या कुटुंबातील सदस्यही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य मिळालं होतं. भारताकडून के. एल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची तर विराट कोहलीने ५४ धावांची खेळी केली. कर्णधार रोहित शर्माने अवघ्या ३१ चेंडूत ४७ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. भारताने पहिल्या १० षटकांत ८० धावा करत दमदार सुरुवात केली होती, मात्र रोहित शर्मा बाद झाल्यानंतर धावांचा वेग कमी झाला. ११ ते ४० षटकांदरम्यान भारतीय फलंदाजांना केवळ दोनच चौकार लगावता आले.

प्रत्युत्तरात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने १३७ धावांची शतकी खेळी केली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या. मिचेल मार्श १५ धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद २ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus cwc 2023 final anushka sharma ritika sajdeh get emotional after india defeat ssa