Ravi Shastri On Virat Kohli And Rohit Sharma: भारतीय संघातील स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सध्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यात आहेत. दोघांनी कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हा ऑस्ट्रेलिया दौरा दोघांचाही शेवटचा ऑस्ट्र्रेलिया दौरा असू शकतो. दोघं २०२७ चा वर्ल्डकप खेळण्याच्या तयारीत आहेत, पण त्यांना या स्पर्धेपर्यंत भारतीय संघातील स्थान टिकवून ठेवता येईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट आणि रोहितबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहली इंग्लंडमध्ये फलंदाजीचा कसून सराव करत होता. तर दुसरीकडे रोहित शर्माने मुंबईतील मैदानांवर जाऊन फलंदाजीचा सराव केला. यावरून हे स्पष्ट झालं की, दोघांनाही वर्ल्डकपपर्यंत तरी संघात स्थान टिकवून ठेवायचं आहे. रवी शास्त्री आयसीसीशी बोलताना म्हणाले की, “दोघेही जगभरात आदरणीय आणि प्रिय आहेत. या स्टार जोडीने दिलेलं योगदान विसरता येणार नाही. हे योगदान २ किंवा ३ वर्षांचं नाही. विराटने एक ते दीड दशकांहून अधिक काळ योगदान दिलं आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “हे योगदान खूप मोठं आहे. लोकं ते कधीच विसरणार नाहीत. क्रिकेटमधील काही सर्वोत्कृष्ट गोलंदाजांविरूद्ध त्यांनी दमदार खेळ केला आहे. हे खूप खास आहे. त्यांनी उद्या निवृत्ती घेतली काय आणि परवा निवृत्ती घेतली काय , पण त्यांचा वारसा मात्र कायम राहिल.”
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दोघांनाही पहिल्या वनडेत खेळण्याची संधी मिळाली होती.७ महिन्यांनंतर पुनरागमन करताना दोघांनाही हवी तशी कामगिरी करता आली नाही. विराट कोहली शून्यावर तर रोहित शर्मा अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत दोघांकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
विराट आणि रोहितच्या पुनरागमनाबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले,”दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन केल्यानंतर खेळावर परिणाम होतोच. कोणत्याही परदेशी संघासाठी पर्थमध्ये सामना सुरू होण्याच्या दोन दिवसाआधी ऑस्ट्रेलियात उतरणे आणि त्या वातावरणाशी जुळवून घेणं इतकं सोपं नसतं. पर्थमध्ये फलंदाजांना अतिरिक्त उसळी आणि दर्जेदार गोलंदाजांचा सामना करायचा असतो. पण मला वाटतं की, वेळ त्यांना नक्की उत्तर देईल. आता ते अॅडलेडला जातील, जिथे त्यांना नेट्समध्ये सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.” भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना २३ ऑक्टोबरपासून अॅडलेडमध्ये रंगणार आहे.