India Batting Coach on Rohit Sharma Virat Kohli: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलं. रोहित-विराट पर्थमधील पहिल्या वनडे सामन्यात फेल झाले. यानंतर रोहित-विराटला सध्या ट्रोल केलं जात आहे. रोहित-विराटच्या फॉर्मची आणि फलंदाजीची सर्वत्र चर्चा सुरू असताना भारताचे फलंदाजी कोच सितांशु कोटक यांनी वक्तव्य केलं आहे.
माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनानंतरची सुरुवात फारशी चांगली राहिली नाही. तब्बल सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर दोघेही राष्ट्रीय संघात परतले, मात्र त्यांची बॅट शांत होती. जोश हॅजलवूडच्या उसळत्या चेंडूवर रोहित दुसऱ्या स्लिपमध्ये झेलबाद झाला, तर मिचेल स्टार्कविरुद्ध कोहलीने पॉईंटवर सोपा झेल दिला.
निराशाजनक कामगिरीनंतर प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी सांगितलं की, भारताच्या फलंदाजीवर हवामानाचा मोठा परिणाम झाला. पावसामुळे खेळ वारंवार थांबत असल्याने फलंदाजांची लय आणि टायमिंग बिघडलं, ज्याचा परिणाम त्यांच्या फलंदाजीवर झाला.
रोहित-विराटच्या फलंदाजीबाबत काय म्हणाले सितांशु कोटक?
रोहित आणि कोहलीच्या खेळात थोडी गती आणि लय कमी दिसली का; यावर बोलताना सितांशु कोटक म्हणाला, “मला तसं वाटत नाही. “दोघंही IPL खेळले आहेत. त्यांची तयारी उत्तम झाली होती. मला वाटतं, इथे हवामानाचा प्रश्न होता. ऑस्ट्रेलिया फलंदाजीला आला असता तरी परिस्थिती तशीच असती. जेव्हा खेळात चार-पाच वेळा व्यत्यय येतो आणि दोन षटकांनी तुम्ही आत जाता-बाहेर येता, तेव्हा फलंदाजासाठी लय पकडणं सोपं नसतं.”
सितांशु कोटक पुढे म्हणाले, “दोघेही खूप अनुभवी खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलियात येण्याआधी त्यांनी योग्य तयारी केली होती. मला वाटतं, त्यांच्या कामगिरीबाबत इतक्या लवकर मत मांडणं घाई केल्यासारखं होईल. त्यांनी नुकतंच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या मालिकेत येण्याआधी आम्हाला त्यांच्या फिटनेस आणि तयारीबद्दल सविस्तर माहिती होती. NCA मधून त्यांच्या सरावाचे व्हिडिओ आम्ही पाहिले होते. अशा वरिष्ठ खेळाडूंबाबत, जर ते योग्य दिशेने काम करत असतील, तर लगेच हस्तक्षेप करण्याची गरज नसते. उलट जास्त हस्तक्षेप करणं कदाचित योग्य ठरणार नाही.”
“विराट आणि रोहित दोघेही चांगल्या लयीत दिसले. त्यांनी काल नेट्समध्येही उत्तम फलंदाजी केली. प्रामाणिकपणे सांगायचं तर, ते दोघेही चांगलं करत आहेत”, असं पुढे सितांशु कोटक म्हणाले.
