Harry Brook Sledges Shubman Gill Video: भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलने २६९ धावांची विक्रमी खेळी केली आहे. गिल हा इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा आशियामधील पहिला भारतीय कर्णधार आहे. तर शुबमन गिलने २६९ धावांची खेळी करत कसोटीमध्ये सर्वात मोठी खेळणारा भारतीय कर्णधार ठरला. पण गिलचं पहिलं त्रिशतक मात्र हुकलं होतं. गिल त्रिशतकापासून अवघ्या ३१ धावा दूर होता. पण हॅरी ब्रुकमुळे गिल बाद होत माघारी परतला. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

भारतीय संघाच्या नव्या कसोटी कर्णधाराने जर ही कामगिरी केली असती, तर तो ६१ वर्षांत इंग्लंडमध्ये त्रिशतक करणारा पहिला विदेशी कर्णधार आणि इतिहासातील दुसरा कर्णधार ठरला असता. यापूर्वी, ही कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या बिल सिम्पसनने १९६४ मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे केली होती. पण हॅरी ब्रुकच्या स्लेजिंगमुळे आणि माईंडगेम्समुळे गिल बाद झाला.

दुसऱ्या दिवसाच्या लंचब्रेकनंतर जेव्हा शोएब बशीर शुबमन गिलला गोलंदाजी करत होता, तेव्हा ब्रूक स्लिपमध्ये उभा होता. त्याने भारतीय कर्णधाराला स्लेज करायला सुरुवात केली आणि ‘ट्रिपल सेंच्युरी’चा उल्लेख करून त्याची एकाग्रता भंग करू लागला. ब्रुक शुबमन गिलचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता. स्टम्प माइकमध्ये ब्रुकचं बोलणं स्पष्टपणे ऐकून आलं नाही, पण गिल दोनदा इंग्लंडच्या फलंदाजाला उत्तर देताना व्हीडिओमध्ये दिसून येत आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि चाहत्यांनी रिपोस्ट करत अनेक कमेंट्सही केल्या आहेत.

इंग्लंडचे माजी कर्णधार माइक आथर्टन, जे कॉमेंट्री बॉक्समध्ये होते, त्यांनी सांगितलं की, ब्रुक म्हणाला, “२९० हा सर्वात कठीण स्कोअर आहे.” मग त्याने भारतीय कर्णधाराला विचारले, “तू किती त्रिशतकं केली आहेस?” २०२४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध मुलतान कसोटीत ब्रुकने त्रिशतक झळकावलं होतं याची आठवण आथर्टनने लगेच करून दिली.

इंग्लंडसाठी हॅरी ब्रुकची ही ट्रिक कामी आली कारण पुढच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर गिल बाद झाला. जोश टंगने एक शॉर्ट बॉल टाकला आणि थकलेला गिल हलक्या हाताने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू स्क्वेअर लेगवर ऑली पोपच्या हातात गेला आणि गिल झेलबाद झाला.