भारताचा महिला क्रिकेट संघही सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये दोन्ही संघ ५ टी-२० सामने आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत. आजपासून म्हजेच २८ जूनपासून टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघामध्ये विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या शफाली वर्माचं पुन्हा पुनरागमन झालं आहे. २०२४ मध्ये आपल्या खराब फॉर्ममुळे शफाली संघाबाहेर गेली होती. तिने आता तिच्या पुनरागमनाचं श्रेय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला दिलं आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये खराब फॉर्ममुळे शफाली वर्माला भारतीय संघातू ड्रॉप करण्यात आलं. त्यानंतर शफालीला आता पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये ती या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. संघात पुनरागमन झाल्यानंतर शेफालीने आता एक मोठा खुलासा केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या पुनरागमनाचे श्रेय सचिन तेंडुलकरला देत मोठं वक्तव्य केलं आहे.
बीसीसीआयने शफाली वर्माच्या पुनरागमनाचा खास व्हीडिओ शेअर केला आहे. भारतीय संघातील तिच्या पुनरागमनाबाबत तिने यादरम्यान वक्तव्य केलं आहे. शफाली म्हणाली, “एक खेळाडू जर चांगले क्षण अनुभव शकतो, चांगल्या टप्प्यातून जात असेल तर त्याला वाईट दिवस सुद्धा पाहता आले पाहिजेत. सिलेक्शनच्या १० दिवस आधी माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता, खूप कठीण वेळ होती ती. त्यानंतर मग संघातही माझी निवड झाली नाही. त्यावेळी स्वत:ला सावरणं खूप कठीण होतं.”
सचिन तेंडुलकरचा उल्लेख करत शफाली म्हणाली, “मी आधी प्रत्येक चेंडूवर चौकार-षटकार मारायला पाहत होती. पण नंतर मला कळलं की चांगल्या चेंडूंचा आदर करणंही महत्त्वाचं आहे. संघाबाहेर असताना मी कसोटीतील सचिन सरांचा व्हीडिओ पाहिला. ज्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं आणि प्रेरणा मिळाली.”
शफाली पुढे म्हणाली, “हे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले जेव्हा मी त्यांचा एकही सामना चुकवला नाही. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मला समजलं की चांगल्या चेंडूला आदर देत खेळूनच मी मोठी खेळी करण्यात यशस्वी होऊ शकतो.”
शेफाली वर्मा तिच्या पुनरागमनाबद्दल पुढे म्हणाली की, “जेव्हा तुम्ही पुनरागमन करता तेव्हा परिस्थिती कठीण असते पण संघात परतल्यावर चांगले वाटतं. मी पुनरागमन करू शकली याचा मला आनंद आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निवडीच्या दहा दिवस आधी, माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. तो काळ माझ्यासाठी कठीण होता आणि मला संघातही निवडण्यात आलं नाही. काय चाललंय ते मला समजत नव्हतं.”
“मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आणि आता खूप बरं वाटतंय. वेळ तुम्हाला खूप काही शिकवते, मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन आणि बाकीचं नशिबावर सोडेन”, असं शफाली अखेरीस म्हणाली.