India vs England, 4th Test: मँचेस्टरच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलने दमदार सुरूवात करून दिली. केएल राहुलचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. तर यशस्वी जैस्वालने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

यशस्वी जैस्वालचं हे अर्धशतक विक्रमी ठरलं आहे. कारण तो मँचेस्टरच्या मैदानावर ५० वर्षांनंतर अर्धशतक झळकावणारा पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे. याआधी सुनील गावसकर यांनी मँचेस्टरच्या मैदानावर खेळताना अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे ५० वर्षांनंतर यशस्वी जैस्वालने हा विक्रम मोडून काढलं आहे. यासह यशस्वी जैस्वालने आणखी एका मोठ्या विक्रमात दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

इंग्लंडविरूद्ध असा कारनामा करणारा ठरला ८ वा फलंदाज

यासह त्याने आणखी एका मोठ्या विक्रमात दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. यशस्वीने या डावात आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दरम्यान अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरूद्ध फलंदाजी करताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत. यादरम्यान इंग्लंडविरूद्ध सर्वात जलद १००० धावा करण्याच्या विक्रमात त्याने मोहम्मद अझरूद्दीन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. यशस्वीने १६ व्या डावात हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

मोहम्मद अझरूद्दीन यांनी देखील १६ व्या डावात १००० धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत विव रिचर्ड्स अव्वल स्थानी आहेत. त्यांनी इंग्लंडविरूद्ध फलंदाजी करताना १० डावात १००० धावा पूर्ण केल्या होत्या. तर डॉन ब्रॅडमन यांनी १३ व्या डावात १००० धावांचा पल्ला गाठला होता. वेस्टइंडिजचे दिग्गज खेळाडू ब्रायन लारा यांनी १४ व्या डावात १००० धावा पूर्ण केल्या होत्या.

इंग्लंडविरूद्ध खेळताना सर्वात कमी डावात १००० धावांचा पल्ला गाठणारे फलंदाज

विव रिचर्ड्स- १०
डॉन ब्रॅडमन- १३
ब्रायन लारा- १४
जॉर्ज हेडली- १५
राहुल द्रविड- १५
मोहम्मद युसूफ- १५
मोहम्मद अझरूद्दीन- १६
यशस्वी जैस्वाल- १६