IND vs PAK Handshake Controversy: आशिया चषकातील पाकिस्तानविरूद्ध सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाने सांघिक कामगिरीच्या बळावर पाकिस्तानवर ४ षटकं राखून ७ विकेट्सने विजयाची नोंद केली. चाहत्यांकडून सामना खेळण्यासाठी विरोध होत असतानाही टीम इंडियाने पाकिस्तानविरूद्ध सामना खेळला खरा पण सामन्यादरम्यान संघाने आपला निषेध मात्र नोंदवला. मैदानावर पाकिस्तानी खेळाडूंशी हात न मिळवल्याने पाक संघ संतापला.
पाकिस्तानने दिलेल्या १२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १५.६ षटकांत सहज विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तर गोलंदाजीत कुलदीप यादवसह सर्वच गोलंदाजांनी दणक्यात कामगिरी केली. कुलदीप यादव सलग दुसऱ्यांदा सामनावीर ठरला. सूर्या आणि टीम इंडियाने पाकिस्तानवरील विजय हा भारतीय लष्कराला समर्पित केला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या लोकांना अभिवादन केलं.
सामन्यादरम्यान, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. नाणेफेकीदरम्यान, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आघाशी हस्तांदोलन केलं नाही आणि सामना संपल्यानंतरही हेच दृश्य होतं. सहसा सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात, परंतु भारत-पाकिस्तान सामन्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सरळ ड्रेसिंग रूममध्ये परतले.
सूर्यकुमार यादवने विजयी षटकार लगावला आणि तो शिवम दुबेसह थेट मैदानाबाहेर जायला निघाला. यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाताना त्याने संघातील खेळाडूंशी पारंपारिक हस्तांदोलन केलं आणि संपूर्ण संघ ड्रेसिंग रूममध्ये जात दार लावून घेतलं गेलं. पाकिस्तानचा संघ हे संपूर्ण दृश्य फक्त पाहत राहिला.
भारताने हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तानने केली तक्रार
भारतीय संघाने अशाप्रकारे दुर्लक्ष केल्याने पाकिस्तान संघ वैतागला की त्यांनी याबद्दल तक्रार केली. पीसीबीने DAWN.COM ला सांगितलं की, पाकिस्तान संघ व्यवस्थापक नवीन अख्तर चीमा यांनी भारतीय संघाच्या वाईट वर्तनाबद्दल अधिकृतपणे तक्रार केली आहे. पीसीबीने मॅच रेफ्रींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, कारण त्यांनी दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीदरम्यान हस्तांदोलन करू नये अशी विनंती केली होती.
भारताच्या विजयानंतर पाकिस्तानचा कर्णधार प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी उपस्थित राहिला नाही आणि त्याबाबत संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन म्हणाले की सामन्यानंतर भारतीय संघाचे वर्तन निराशाजनक होते. सामन्यानंतर आम्ही हस्तांदोलन आणि मैत्रीपूर्ण गप्पा मारण्यास उत्सुक होतो, पण तसं झालं नाही.