Dhruv Jurel India Playing 11 IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर सुरू होत आहे. या कसोटीच्या फक्त ४८ तास आधी, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेनडेशकाटे यांनी प्लेईंग इलेव्हनबाबत मोठी अपडेट दिली आहे. यामध्ये ऋषभ पंतसह ध्रुव जुरेलही कोण खेळणार हे समोर आलं आहे.

ऋषभ पंत दुखापतीनंतर पुन्हा भारतीय संघात परतला आहे. इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी मालिकेला मुकला होता. यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटीसाठी त्याची संघात निवड केली आहे. पंतच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलने चांगली कामगिरी केली होती, याशिवाय गेल्या काही महिन्यांमध्ये जुरेल उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने त्यालाही कसोटी मालिकेत खेळवण्याची चर्चा सुरू आहे.

भारताच्या क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेनडेशकाटे यांनी मालिकेपूर्वीच्या पत्रकार परिषदेत प्लेईंग इलेव्हनबाबत मोठी घोषणा केली. पहिल्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेल ऋषभ पंतसह प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

आज १२ नोव्हेंबरला झालेल्या टीम इंडियाच्या दुसऱ्या सराव सत्रापूर्वी पत्रकार परिषदेत सहाय्यक प्रशिक्षक रायन यांना ध्रुव जुरेलच्या खेळवण्याबद्दल विचारले असता म्हणाले, “मला वाटतं की आम्हाला संघात खेळणाऱ्या ११ खेळाडूंच्या कॉम्बिनेशनची चांगली कल्पना आहे. गेल्या सहा महिन्यांत ध्रुव जुरेल ज्या पद्धतीने खेळला आहे आणि गेल्या आठवड्यात त्याने बेंगळुरूमध्ये झळकावलेली दोन शतकं पाहता, तो या आठवड्यात खेळेल हे निश्चित आहे.”

जुरेलने गेल्या वर्षी टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केलं. त्याने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्ध पंतच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आणि तीन डावात १७५ धावा केल्या. या मालिकेत त्याने पहिलं कसोटी शतक केलं होतं. त्यानंतर जुरेलने अलीकडेच दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध एकाच सामन्यातील दोन्ही डावात शतकं झळकावली.

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत या मालिकेसाठी या मालिकेत खेळणार असल्याने जुरेल यष्टीरक्षक म्हणून खेळणार नाही. पंत ही जबाबदारी पार पाडेल आणि जुरेल स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळणारा आहे. अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागणार आहे. नितीश यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग होता पण तिथे त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत.

रायनने ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेचा उल्लेख करत सांगितलं, “पहिली गोष्ट म्हणजे सामन्यात विजयासाठी रणनीती आखणं महत्त्वाचं. नितीशबद्दलचा संघाचा विचार बदललेला नाही. त्याला ऑस्ट्रेलियामध्ये फारशी संधी मिळाली नाही. पण मी म्हणेन की मालिकेचं महत्त्व आणि परिस्थितींचा विचार करता, नितीश या कसोटीतून बाहेर पडू शकतो.