Gautam Gambhir On Team India Defeat, IND vs SA 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ३० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर खेळपट्टीवरून जोरदार टीका केली जात आहे. रँक टर्नर खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांचा निभाव लागू शकला नाही, असा आरोप केला जात आहे. पण भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून पराभवाचं कारण सांगितलं आहे.

खेळपट्टीवर टीका होत असताना सौरव गांगुली यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की, भारतीय संघाला अशीच खेळपट्टी हवी होती. गंभीरनेही हे मान्य केलं आणि पीच क्युरेटरचं कौतुक केलं. भारतीय संघाला हवी तशी खेळपट्टी मिळाली, पण फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नसल्याचं गंभीरने सांगितलं.

गौतम गंभीर काय म्हणाला?

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “आम्हाला अशीच खेळपट्टी अपेक्षित होती. पीच क्युरेटरने आम्हाला मोठी मदत केली. आम्हाला नेमके जे हवे होते, तेच या खेळपट्टीने दिले. या खेळपट्टीमध्ये कोणतीही उणीव नव्हती. इथे तेंबा बावुमाने धावा केल्या, त्याचप्रमाणे अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरनेही धावा केल्या. त्यामुळे, प्रत्येक वेळी खेळपट्टीबाबत चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सर्वाधिक विकेट्स या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत.”

भारतीय संघाचा पराभव

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १५९ धावांवर आटोपला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आल्यानंतर भारतीय संघाचा डाव १८९ धावांवर आटोपला. भारतीय संघाने पहिल्या डावात ३० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १५३ धावांवर आटोपला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव ९३ धावांवर आटोपला. यासह दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली.