IND vs SA 2nd ODI : भारतानं वनडे मालिकाही गमावली..! दक्षिण आफ्रिकानं जिंकला दुसरा सामना

दुसऱ्या वनडेत आफ्रिका संघानं भारताला ७ गड्यांनी मात दिली.

IND vs SA 2nd ODI Live Updates
दक्षिण आफ्रिका संघाने जिंकला दुसरा वनडे सामना

दक्षिण आफ्रिका संघाने भारताविरुद्धची वनडे मालिका खिशात टाकली आहे. पार्ल येथील बोलंड पार्क स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात आफ्रिकाने भारताला ७ गड्यांनी सहज मात दिली आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताचा कप्तान केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऋषभ पंतच्या ८५ धावा आणि राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आफ्रिकेला २८८ धावांचे आव्हान दिले. अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर शार्दुल ठाकूरने संघासाठी ४० धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक आणि जानेमन मलान यांनी अर्धशतके ठोकली, तर कप्तान टेंबा बावुमाने संघाला आधार दिला. भारताने दिलेले आव्हान आफ्रिकाने ४८.१ षटकातच पूर्ण केले. आता या मालिकेतील तिसरा सामना रविवारी २३ जानेवारीला केपटाऊनमध्ये खेळवण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा डाव

भारताला प्रत्युत्तर देताना क्विंटन डी कॉक आणि जानेमन मलान या आफ्रिकेच्या सलामीवीरांना चांगली सुरुवात केली. डी कॉकने आक्रमक फलंदाजी करत आठव्या षटकात संघाचे अर्धशतक फलकावर लावले. १२व्या षटकात डी कॉकने आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी भारताच्या गोलंदाजांचा समाचार घेत फलंदाजी केली. १६व्या षटकात आफ्रिकेचे शतक पूर्ण झाले. त्यानंतर मलानने आपले अर्धशतक पूर्ण केले. शार्दुल ठाकूरने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने डी कॉकला पायचीत पकडले. डी कॉकने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. त्याने मलानसोबत पहिल्या गड्यासाठी १३२ धावांची भागीदारी केली. डी कॉकनंतर कप्तान टेंबा बावुमा मैदानात आला. त्याने मलानसोबत संघाला दोनशेपार पोहोचवले. शतकाकडे वाटताल करणाऱ्या मलानला बुमराहने बोल्ड केले. मलानने ८ चौकार आणि एका षटकारासह ९१ धावांची खेळी केली. त्यानंतर फिरकीपटू चहलने भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्याने बावुमाला (३५) स्वत: च्या गोलंदाजीवर झेलबाद केले. २१४ धावांवर आफ्रिकेने ३ फलंदाज गमावले. त्यानंतर आलेल्या एडन मार्कराम आणि रुसी व्हॅन डर डुसेन यांनी आफ्रिकेचा विजय निश्चित केला. डुसेन ३७ तर मार्कराम धावांवर नाबाद राहिला. ४८.१ षटकात आफ्रिकाने आव्हान पूर्ण केले.

भारताचा डाव

केएल राहुल आणि शिखर धवन यांनी भारताच्या डावाची उत्तम सुरुवात केली. नवव्या षटकात दोघांनी भारताचे अर्धशतक फलकावर लावले. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी केली. एडन मार्करामने धवनला (२९) तर केशव महाराजने विराट कोहलीला (०) बाद करत भारताला लागोपाठ दोन धक्के दिले. महाराजने विराटला बावुमाकरवी झेलबाद केले. राहुलने ऋषभ पंतला सोबत घेत भारताला आधार दिला. पंतने आक्रमक फलंदाजी करत राहुलच्या अगोदरच अर्धशतक फलकावर लावले. २५ षटकात भारताने २ बाद १४१ धावा केल्या. राहुलनेही संयमी अर्धशतक पूर्ण केले. ५५ धावा करताच राहुलला सिसांडा मगालाने बाद केले. राहुल आणि पंतने शतकी भागीदारी फलकावर लावली. राहुलनंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. राहुल माघारी परतल्यावर पंतही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सीने त्याला ८५ धावांवर बाद केले. पंतने १० चौकार आणि २ षटकार ठोकले. भारताने २०७ धावांवर आपला पाचवा गडी श्रेयसच्या रुपात गमावला. कारकिर्दीच्या दुसऱ्या वनडेत व्यंकटेश अय्यर २२ धावांचे योगदान देऊन अँडिले फेलुक्वायोचा बळी ठरला. मागील सामन्यात अर्धशतक ठोकलेला शार्दुल ठाकूर पुन्हा भारतासाठी धावून आला. त्याने अश्विनसह छोटेखानी भागीदारी रचली. शार्दुलने ३ चौकार आणि एका चौकारासह नाबाद ४० धावांची खेळी केली. तर अश्विन २५ धावांवर नाबाद राहिला. भारताने ५० षटकात ६ बाद २८७ धावा केल्या.

हेही वाचा – ICC T20 World Cup 2022 : आयसीसीने जाहीर केले वेळापत्रक ; भारत – पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार

दोन्ही संघांची Playing 11

दक्षिण आफ्रिका – टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, जानेमन मलान, रुसी व्हॅन डर डुसेन, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, अँडिले फेलुक्वायो, मार्को जानसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी.

भारत – केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, यजुर्वेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs sa 2nd odi live updates adn

Next Story
भारतीय संघातील क्रिकेटपटूने स्वत:च्याच बर्थ डे पार्टीत प्रेयसीला केलं प्रपोज; Marry Me म्हणत साखरपुडाही उरकला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी