श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही एका मराठमोळ्या फलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. या फलंदाजाचे तंत्र आणि कौशल्य पाहून राहुल द्रविडसारख्या दिग्गजांनीही त्याचे कौतुक केले. हा फलंदाज म्हणजे महाराष्ट्राचा सुपुत्र ऋतुराज गायकवाड. ऋतुराजचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असून त्याचे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. त्याला एकदिवसीय मालिकेत संधी मिळाली नाही, परंतु टी-२० मध्ये त्याने आज पदार्पण केले. ऋतुराजने शिखर धवनसोबत सलामी दिली. ऋतुराज आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वातील संघ चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीवीर फलंदाज म्हणून ओळखला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋतुराजची कारकीर्द

महाराष्ट्राच्या ऋतुराजने २१ प्रथम श्रेणी, ५९ लिस्ट ए सामने आणि ४६ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३८.५४च्या सरासरीने १३४९ धावा केल्या असून यात ४ शतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ७ शतकांच्या मदतीने २६८१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टी-२० मधील ११ अर्धशतकांच्या मदतीने या फलंदाजाने १३३७ धावा केल्या आहेत.

 

धोनीने दिला होता सल्ला

आयपीएलच्या मागील पर्वात चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही, परंतु ऋतुराज गायकवाडने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. ऋतुराजने अंतिम तीन सामन्यात सलग तीन अर्धशतके झळकावली होती. हा पराक्रम करणारा तो चेन्नईचा एकमेव खेळाडू आहे. चांगल्या कामगिरीपाठी धोनीचा सहभाग असल्याचे ऋतुराजने सांगितले होते. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनी ऋतुराजशी बोलला होता. ”मला तुझ्यावर दबाव आणायचा नाही, पण मला तुमच्याकडून अपेक्षा आहेत. तू पुढील तीन सामने खेळशील. फक्त त्या सामन्यांचा आनंद घे आणि धावांचा विचार करू नकोस”, असे धोनीने ऋतुराजला सांगितले होते.

हेही वाचा – SL vs IND 2nd T20 : श्रीलंकेनं जिंकली नाणेफेक, टीम इंडियाकडून चार खेळाडूंचं पदार्पण

धोनीच्या या संवादामुळे ऋतुराजचा आत्मविश्वास वाढला. याच कामगिरीच्या जोरावर आज तो टीम इंडियाचा भाग झाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl second t20 ruturaj gaikwad made his debut for team india adn
First published on: 28-07-2021 at 20:33 IST