Ravindra Jadeja Record: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी ३ भारतीय फलंदाजांनी शतकं झळकावली. सुरुवातीला केएल राहुल मग ध्रुव जुरेल आणि शेवटी रवींद्र जडेजा. या तिन्ही फलंदाजांनी विक्रमांचा पाऊस पाडला. दरम्यान रवींद्र जडेजाच्या नावे देखील एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

रवींद्र जडेजा गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान देत आहे. जेव्हा गरज असते ते गोलंदाजीत आपलं योगदान देतो. जेव्हा धावा करायच्या असतात तेव्हा फलंदाजीतही तो खंबीरपणे उभा राहतो. वेस्टइंडिज खेळताना झळकावलेलं शतक हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावं शतक ठरलं आहे. यासह त्याने ३०० हून अधिक गडी बाद करणाऱ्या आणि ६ शतक झळकावण्याचा पराक्रम करण्याच्या विक्रमात दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

या यादीत भारतीय संघातील दिग्गज कपिल देव,आर अश्विन, इंग्लंडचे इयान बॉथम, पाकिस्तानचे इमरान खान आणि न्यूझीलंडच्या डॅनियल विटोरी यांचा समावेश आहे. वेस्टइंडिजविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत त्याने १६९ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं.

भारतीय संघ मजबूत स्थितीत

या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पूर्णपणे फसला. कारण वेस्टइंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या केएल राहुलने १०० धावांची खेळी केली. तर कर्णधार शुबमन गिलने ५० धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने १२५ धावण्याची धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजा १०४ धावांवर नाबाद परतला. भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ५ गडी बाद ४४८ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने २८६ धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान तिसरा दिवसाचा खेळ सुरू होण्याआधीच भारतीय संघाने पहिला डाव घोषित केला आहे.