IND vs ENG 4th T20I Highlights in Marathi: संघाची अष्टपैलू कामगिरी, भेदक गोलंदाजी, वादळी फलंदाजी अन् भारताने इंग्लंडविरूद्ध ३-१ च्या फरकाने मालिका विजय मिळवला. इंग्लंडविरूद्ध चौथ्या टी-२० सामन्यात १५ धावांनी आणि ३ चेंडू राखून विजय मिळवला. भारताचे गोलंदाज आणि शिवम दुबे-हार्दिक पंड्याने इंग्लंडकडून हा सामना हिसकावून घेतला. भारताने इंग्लंडला १८२ धावांचे आव्हान दिले होते. पण संघ १६६ धावांवर सर्वबाद झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडचा संघ या सामन्यात १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला, तेव्हा बेन डकेट आणि फिल सॉल्ट या सलामीच्या जोडीने त्यांना चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. यावेळेस सामना भारताच्या हातून निसटतो का अशी भिती निर्माण झाली. पण ही भागीदारी तोडण्याचे काम टीम इंडियाचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोईने केले. यानंतर भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. जोस बटलर केवळ २ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर लियाम लिव्हिंगस्टन केवळ ९ धावा आणि जेकब बेथेल ६ धावाच करू शकला.

हॅरी ब्रूकने या सामन्यात एका टोकाकडून २६ चेंडूत ५१ धावांची खेळी खेळून निश्चितच इंग्लंडला सामन्यात कायम ठेवले, पण या मालिकेत तो पुन्हा एकदा वरुण चक्रवर्तीचा बळी ठरला आणि इथूनच इंग्लंडचा सामना भारताच्या बाजूने वळला. या सामन्यात रवी बिश्नोईने ४ षटकात केवळ २८ धावा देत तीन विकेट्स घेतल्या, तर हर्षित राणाने ४ षटकात ३३ धावा देत तीन महत्त्वपूर्ण विकेट मिळवले. याशिवाय वरुण चक्रवर्तीने २ तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी १ विकेट घेतली.

नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंड संघाने भारताला प्रथम फलंदाजासाठी पाचारण केले. भारताच्या सलामीच्या जोडीने पहिल्याच षटकात १२ धावा करत दणक्यात सुरूवात केली. पण दुसऱ्या षटकात भारताला एक नव्हे तीन धक्के बसले. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा पहिल्या दोन चेंडूवर झेलबाद झाले. तर तिसऱ्या चेंडूवर कर्णधार सूर्यकुमार यादव झेलबाद झाला. साकिब महमूदने एका षटकात ३ विकेट घेत एकही धाव दिली नाही. भारताची स्थिती दुसऱ्या षटकानंतर १२-३ अशी होती. पण यानंतर रिंकू सिंगने ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाचा डाव सावरला.

रिंकू सिंग बाद झाल्यानंतर टीम इंडिया पुन्हा अडचणीत आली. पण भारताचे दोन अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी ८७ धावांची विक्रमी भागीदारी रचत भारताला १८१ धावांची महत्त्वपूर्ण धावसंख्या उभारण्यात मदत केली. इतकंच नाही तर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी शानदार अर्धशतक झळकावली. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मध्ये हार्दिक पांड्याने ३० चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५३ धावांची खेळी खेळली. तर शिवम दुबेने ७ चौकार आणि २ षटकारांसह ३४ चेंडूत ५३ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India beat england by15 runs and wins t20i series harshit rana debut hardik pandya shivam dube fifties ind vs eng bdg