नवी दिल्ली : ऑलिम्पिक २०३६ स्पर्धेच्या यजमानपदाची स्पर्धा कठीण असली, तरी भारताची बाजू भक्कम असल्याचे मत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) निवडणुकीतील अध्यक्षपदाचे प्रमुख उमेदवार असलेल्या सेबॅस्टियन को यांनी व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने २०३६ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी ‘आयओसी’कडे इरादा पत्र सादर केले आहे. यजमानपदाच्या कठीण परिक्षेतील हे पहिले पाऊल होते. ऑलिम्पिक यजमानपदासाठी केवळ भारत हा एकमेव देश बोली लावणार नाही. पोलंड, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, कतार, हंगेरी, तुर्की, मेक्सिको, इजिप्त असे अन्य देशही या शर्यतीत आहेत. मात्र, स्पर्धेचे आयोजन करताना भारत जे काही करू शकतो त्याचा त्यांना भक्कम आधार मिळेल, असे को यांनी एका मुलाखतीत सांगितले.

ऑलिम्पिक २०३६ च्या यजमानपदाचा निर्णय २०२६ पूर्वी कळणार नसला, तरी तो ‘आयओसी’च्या नव्या अध्यक्षांच्या काळात घेतला जाणार आहे हे निश्चित. ‘आयओसी’चे विद्यामान अध्यक्ष थॉमस बाख यांचा कार्यकाळ संपला असून, येत्या १८ ते २१ मार्च या कालावधीत ग्रीस येथे ‘आयओसी’चे १४४वे अधिवेशन होणार आहे. यामध्ये २० मार्च रोजी नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. यासाठी ‘आयओसी’चे शंभरहून अधिक सदस्य मतदान करणार आहेत.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत को यांच्यासह जॉर्डनचे राजकुमार फैझल अल हुसेन, फ्रान्सचे डेव्हिड लॅपार्टियंट, स्वीडनचे योहान एलियाश, स्पेनचे ज्युआन अॅण्टानियो सामरांच (कनिष्ठ), झिम्बाब्वेचे क्रिस्टी कोव्हेंट्री आणि जपानचे मोरिनारी वतानाबे यांचा समावेश आहे.

को जागतिक अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आहेत. ‘‘अॅथलेटिक्समध्ये अलीकडच्या काळात दक्षिण आशियाचे महत्त्व वाढत आहे. अॅथलेटिक्स हे ऑलिम्पिक चळवळीचा केंद्रबिंदू आहे. अधिकाअधिक तरुणांना खेळाकडे वळवून ऑलिम्पिक चळवळ वाढविण्याची क्षमता दक्षिण आशियाकडे असून, यामधील भारत एक प्रमुख देश आहे,’’ असे को म्हणाले.

को यांनी गेल्याच वर्षी प्रचारासाठी भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत एक बैठक झाली होती. या बैठकीत मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेने आपण प्रभावित झालो, असे को यांनी सांगितले. ‘‘आरोग्यावर परिणाम करण्यासाठी खेळासारखे दुसरे साधन नाही, यावर आमचे एकमत झाले होते. क्रीडा धोरण हे आरोग्य, शिक्षण, सामाजिक एकता आणि अर्थव्यवस्थेत सर्वात प्रभावशाली गुंतवणूक ठरते ही मोदी यांची भूमिका आपल्याला भावली होती. म्हणूनच ऑलिम्पिक चळवळीत आशिया मोठे योगदान देऊ शकते याची मला खात्री आहे आणि भारत यात मोठी भूमिका बजावू शकेल,’’ असे को म्हणाले.

आशिया एक मोठा खंड आहे. यामध्ये चीन आणि जपानसारखे मोठे भाग आहेत. मात्र, सर्वांचा एकच दृष्टिकोन असू शकत नाही. प्रत्येकाचे विकास कार्यक्रम वेगळे असतात.

ऑलिम्पिक चळवळीत आशियाची भूमिका भविष्यात मोठी असेल. – सेबॅस्टियन को, ‘आयओसी’ अध्यक्षपदाचे उमेदवार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India has strong case in olympics bid says sebastian coe zws