आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामने खेळाइतकंच खेळाव्यतिरिक्त गोष्टींनी चर्चेत राहिले. आठवडाभरात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. यावेळेस निमित्त आहे वूमन्स वनडे वर्ल्डकपचं. पाकिस्तान भारतात खेळणार नसल्याने कोलंबो इथे रविवारी ही लढत होणार आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर, सूर्यकुमार यादवप्रमाणे हँडशेक न करण्याचा निर्णय घेणार का हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
वर्ल्डकप ही आयसीसीतर्फे आयोजित होणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेचे नियम, परंपरांचं पालन केलं जातं. यानुसार टॉसवेळी दोन्ही कर्णधार हँडशेक करतात. मात्र आशिया चषकातील घटनांच्या पार्श्वभूमीवर हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची कर्णधार फातिमा साना हँडशेक काय करतात याविषयी साशंकता आहे.
बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरमनप्रीत आणि भारतीय संघाला हँडशेक संदर्भात कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सामन्याला आठवडाभराचा कालावधी असल्याने त्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धा असल्याने नियम तसंच शिष्टाचाराचं पालन केलं जाईल असं सूत्रांनी सांगितलं.
हारिस रौफने विमानं पाडल्याचा केलेली खूण असो किंवा साहिबजादा फरहानने बझूका अर्थात बंदूक चालवल्यासारखं सेलिब्रेशन असो- सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत फातिमान हारिस रौफप्रमाणे सेलिब्रेशन केलं होतं. दरम्यान आपण संघाला परत बोलवायला हवं. आपण भारताशी क्रिकेट खेळायला नको. आपण ठाम भूमिका घ्यायला हवी असं पाकिस्तानचा माजी विकेटकीपर बॅट्समन कामरान अकलमने म्हटलं आहे.
मैदानाबाहेरच्या या घटनांचा खेळाडूंवर ताण येऊ शकतो असं माजी खेळाडू शोभा पंडित यांनी सांगितलं. ‘खेळात राजकारण आणलं तर त्याचा त्रास खेळाडूंनाच होईल. भारतीय संघाने हँडशेक करणं किंवा न करणं,बोलणं- न बोलणं असो, त्यांना योग्य वाटेल ती भूमिका घ्यावी. पाकिस्तान संघातले खेळाडूही माणसंच आहेत हेही लक्षात ठेवावं. त्यांनाही भावभावना आहेत. तेही जिंकण्यासाठीच खेळणार आहेत. सभ्यता आणि नियमांचं पालन करून सामना खेळावा’, असं पंडित यांना वाटतं.
‘हरमनप्रीत आणि तिच्या संघाने सूर्यकुमार आणि संघाने जशी भूमिका घेतली तसंच वागावं. सूर्याप्रमाणेच हरमनप्रीतने पाकिस्तानचा सामना करावा. अतिरिक्त दडपण वगैरे घेऊ नये’, असं माजी क्रिकेटपटू संध्या अगरवाल यांना वाटतं.
वर्ल्डकपशी निगडीत कार्यक्रमात हरमनप्रीतला यासंदर्भात विचारण्यात आलं. हा कार्यक्रम बंगळुरू आणि कोलंबो अशा दोन ठिकाणी झाला. जेणेकरून भारत-पाकिस्तानचे कर्णधर एकसाथ असू नयेत. ‘आम्ही मैदानावर सर्वोत्तम खेळ करू शकतो. आम्ही बाकी कशाचा विचार करत नाही. अन्य गोष्टींवर आमचं नियंत्रण नाही. खेळताना आमचं तिकडे लक्ष नाही. ड्रेसिंगरुममध्ये आम्ही या गोष्टींची चर्चा करत नाही. आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत’, असं हरमनप्रीत म्हणाली होती.
२०२२ मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांविरुद्ध खेळले होते. भारताने तो सामना मोठ्या फरकाने जिंकला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये सौहार्दचं वातावरण पाहायला मिळालं. भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या बिसमाह मारुफच्या सहा महिन्यांच्या लेकीबरोबर खेळताना पाहायला मिळाले होते. सोशल मीडियावर तो व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. स्मृती मान्धनाने त्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्टही लिहिली होती. ‘बाळाला जन्म दिल्यानंतर सहा महिन्यात स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं अतिशय कठीण आहे. बिसमाह मारुफने जगभरातील क्रिकेटपटूंसमोर अनोखा आदर्श ठेवला आहे. बिसमाहच्या लेकीला खूप साऱ्या शुभेच्छा. आशा आहे की लेकही बिसमाहप्रमाणे क्रिकेट खेळू लागेल’, असं स्मृतीने लिहिलं होतं.
आशिया चषकात काय झालं?
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघाशी हस्तांदोलन करणं टाळलं. भारतीय संघानेही पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. तिन्ही सामन्यात भारतीय संघाने आणि कर्णधाराने हीच भूमिका घेतली. प्राथमिक, सुपर फोर आणि फायनल अशा तिन्ही लढतीत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. अंतिम लढतीत भारताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं. नक्वी स्वत: करंडक देण्यावर ठाम राहिले. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे अधिकाऱ्यांच्या हस्ते करंडक देण्याचा प्रस्ताव नक्वी यांनी नाकारला. भारतातर्फे सपोर्ट स्टाफमधील दोन विदेशी प्रशिक्षक जेतेपदाचा करंडक स्वीकारतील असा प्रस्तावही ठेवण्यात आला. मात्र नक्वी यांनी त्यालाही नकार दिला. कोणताच तोडगा निघत नसल्याने ट्रॉफीसह नक्वी रवाना झाले. पुरस्कार वितरण सोहळ्याला ते उपस्थित होते. मात्र भारतीय संघ पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं सूत्रसंचालक सायमन डूल यांनी सांगितलं.