India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी सामन्याला आज २३ जुलैपासून सुरूवात झाली आहे. यजमान संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतील सर्व ४ सामन्यांची नाणेफेक स्टोक्सने जिंकली आहे. नाणेफेकीनंतर चौथ्या कसोटीची प्लेईंग इलेव्हन शुबमन गिलने जाहीर करताच एक अनोखा विक्रम पाहायला मिळाला.

चौथ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारतीय संघाने तीन बदल केले. साई सुदर्शन, अंशुल कंबोज आणि शार्दुल ठाकूर यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केलं आहे. नितीश कुमार रेड्डी आणि आकाश दीप दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहे तर करुण नायर मोठी खेळी न करू शकल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. सुदर्शनला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केल्याचे जाहीर करताच गेल्या ९३ वर्षांत जे घडलं नाही ते मँचेस्टर कसोटीत घडलं आहे.

पहिल्यांदाच, भारताने कसोटी सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये पाच डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश केला आहे. टीम इंडिया १९३२ पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे आणि ९३ वर्षांच्या इतिहासात, २०२५ च्या मँचेस्टर कसोटीपूर्वी असं कधीही घडलं नव्हतं. पण ३२ वेळेस भारताने संघात ४ डावखुरे फलंदाज खेळवले आहेत.

यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर हे डावखुरे फलंदाज आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पाचही फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. याआधी खेळलेल्या तीनही कसोटी सामन्यांमध्ये भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये चार डावखुरे फलंदाज होते.

भारताने गमावली १४वी नाणेफेक

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत, कर्णधार शुबमन गिलला आतापर्यंत एकाही सामन्यात नाणेफेक जिंकता आलेली नाही. मँचेस्टर कसोटीतही नाणेफेकीचा निर्णय इंग्लंडच्या बाजूने लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, भारतीय संघाने गेल्या १४ सामन्यांमध्ये एकदाही नाणेफेक जिंकलेली नाही. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा नाणेफेक गमावण्याचा सिलसिला शुबमन गिलने इंग्लंडच्या भूमीवर कायम ठेवला आहे.