पीटीआय, इंदूर

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात सगळे सुरळीत सुरू असताना माझ्या बाद होण्यामुळे फलंदाजी कोसळली अशी कबुली देत भारताची उपकर्णधार स्मृती मनधाना हिने पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेतली.

इंग्लंडच्या २८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मनधाना, हरमनप्रीत कौर या उपकर्णधार, कर्णधार जोडीच्या भागीदारीने भारताला विजयाचा मार्ग दाखवला होता. हरमनप्रीतसह तिने १२५, तर पाठोपाठ दीप्ती शर्माच्या साथीत ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती. परंतु, संघाला गरज असताना मनधानाची फटक्याची निवड चुकली. पाठोपाठ रिचा घोषनेदेखील सोपा झेल दिला. दीप्तीनेदेखील इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांना सरावासारखा झेल दिला.

‘‘भारतीय संघ विजयाच्या मार्गावर होता. पण, त्या वेळी आमची फटक्यांची निवड चुकली. विशेषतः मी स्वतः संयम बाळगणे आवश्यक होते. माझ्याकडूनच आततायीपणाला सुरुवात झाली,’’ असे मनधाना म्हणाली.

‘‘षटकामागे सहा धावांची गती आवश्यक असताना आम्हाला खेळ अधिक खोलवर न्यायला हवा होता. यामध्ये पहिली चूक माझ्याकडून झाली. त्या वेळी तसा फटका खेळण्याची गरज नव्हती. माझ्या बाद होण्यामुळे दबावाखाली नंतर भारतीय फलंदाजी कोसळली. संपूर्ण डावात हवेतून फटका न खेळण्याचा संयम मी निर्णायक क्षणी राखू शकले नाही,’’ असे मनधानाने सांगितले.

‘‘खेळामध्ये भावनांना स्थान नसते. मैदानावर फक्त जिंकणे हीच एकमेव भावना असू शकते. पण, महत्त्वाच्या क्षणी मी भावना आवरू शकले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धदेखील असेच घडले होते. आघाडीच्या फळीने धावा केल्या. मधल्या आणि तळातील फलंदाजांना त्या मार्गावरून फक्त पुढे जायचे होते. पण, तेव्हा देखील फटक्यांची निवड चुकली,’’ असे मनधाना म्हणाली.

लक्ष्याचा पाठलाग करणे किंवा आव्हान उभे करणे यात केव्हाही अचूक शेवट करणे नेहमीच आव्हानात्मक असते. इंग्लंडचादेखील अचूक शेवट करण्यात अपयश आले. षटकामागे सातची धावगती राखणे हे क्वचित जमते, असेही मनधानाने सांगितले.

सातत्याने अपयशी ठरणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जला या सामन्यात वगळून रेणूका सिंह ठाकूरला संधी देण्यात आली होती. या बदलाचेही मनधानाने समर्थन केले. ‘‘गेल्या दोन सामन्यांत आम्हाला निश्चितपणे सहाव्या गोलंदाजाची उणीव भासली होती. इंदूर आणि विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर आम्हाला हे अधिक जाणवले. एखाद्या गोलंदाजांचा दिवस वाईट असेल, तर त्या वेळी सहाव्या गोलंदाजांचा वापर फायदेशीर ठरतो या विचारानेच रेणुकाला संधी दिली,’’ असे मनधाना म्हणाली. संघाचे संतुलन महत्त्वाचे असते. उर्वरित सामन्यात अंतिम संघ निवडताना परिस्थिती कशी आहे, खेळपट्टी कशी खेळेल या सगळ्याचा विचार करुन निर्णय घेऊ.- स्मृती मनधाना, भारतीय संघाची उपकर्णधार