मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरुष संघांतील दुसरा ट्वेन्टी-२० सामना आज, शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) रंगणार असून या वेळीही पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल दोन स्थानांवर असणाऱ्या या संघांतील पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र, पहिल्या सामन्यात चाहत्यांचा हिरमोड झाला. कॅनबेरा येथील हा सामना दहाव्या षटकातच रद्द करावा लागला होता. आता शुक्रवारी होणाऱ्या सामन्याच्या वेळीही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परंतु हा अंदाज फोल ठरेल अशी दोन्ही संघांच्या चाहत्यांना आशा असेल.

या मालिकेपूर्वी फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादव याच्यावर कामगिरी उंचावण्यासाठी दडपण होते. कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारला फलंदाजीत सातत्याने अपयश येत होते. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला सूर गवसला. त्याने २४ चेंडूंत नाबाद ३९ धावांची खेळी केली. यात त्याने जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर १२५ मीटरचा उत्तुंग षटकार लगावला. तसेच नेथन एलिसविरुद्ध सलग तीन चेंडूंवर दोन चौकार आणि एक षटकार मारला. आता दुसऱ्या सामन्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याचा सूर्यकुमारचा प्रयत्न असेल.

पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने या मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सूर्यकुमार आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळाडूंना आक्रमक शैलीत खेळण्याच्या सूचना केल्या असून गेल्या काही काळापासून भारतीय संघ सातत्याने अडीचशेहून अधिकची धावसंख्या उभारत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ९.४ षटकांचा खेळ झाला, त्यात भारताने १ बाद ९७ धावांची मजल मारली होती. एरवी खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घेणाऱ्या शुभमन गिलने या वेळी सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला.

पावसामुळे सामना रद्द करावा लागला, त्या वेळी गिल २० चेंडूंत ३७ धावा करून नाबाद होता. मेलबर्न येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे पावसाचा अंदाज फोल ठरला आणि ठरल्याप्रमाणे सामना झाला, तर गिलचा पुन्हा फटकेबाज खेळी करण्याचा प्रयत्न असेल. अभिषेक शर्माला पहिल्या सामन्यात १४ चेंडूंत १९ धावाच करता आल्या. त्यामुळे त्याचाही मोठ्या खेळीचा मानस असेल.

वेळ : दुपारी १.४५ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.

पुन्हा ‘तोच’ संघ अपेक्षित

कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या तिघांनाच फलंदाजीची संधी मिळाली. पावसामुळे भारताची गोलंदाजीही आली नाही. त्यामुळे मेलबर्न येथील दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल होणे अपेक्षित नाही. जायबंदी हार्दिक पंड्या या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल अशा हर्षित राणाला पहिल्या सामन्यासाठी संघात स्थान मिळाले. त्यामुळे भारताचा ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी गोलंदाज अर्शदीप सिंगला संघाबाहेर बसावे लागले. परंतु आणखी एका सामन्यासाठी त्याला संधी मिळण्याची अपेक्षा नाही.