अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट विश्वचषक २०२३ चा फायनल सामना खेळावला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी देशातील कानाकोऱ्यातून क्रिकेटप्रेमी स्टेडियमवर दाखल झाले आहेत. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या या स्टेडियममध्ये रविवारी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. एका पॅलेस्टिनी समर्थक तरुणाने मैदानात धाव घेत भारतीय फलंदाज विराट कोहलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल सामन्यादरम्यान मैदानात घुसलेल्या तरुणाला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. यावेळी त्याने प्रतिक्रिया दिली आहे. मी विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात घुसलो होतो. मी पॅलेस्टाईनला पाठिंबा देतो, अशी प्रतिक्रिया संबंधित तरुणाने दिली.

हेही वाचा- “मोदी होते म्हणून गुगली पडली, मोदींनीच…”; क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर बोलताना संजय राऊतांची टोलेबाजी

‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत सुरक्षेचा भंग करून मैदानात घुसलेल्या तरुणाने म्हटलं, “माझे नाव जॉन आहे. मी ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. मी विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात प्रवेश केला. मी पॅलेस्टाईनला पाठिंबा देतो.”

मैदानात नेमकं काय घडलं?

रविवारी अहमदाबादमध्ये चालू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल सामन्यादरम्यान ‘फ्री पॅलेस्टाईन’ असा संदेश लिहिलेला टी-शर्ट घातलेल्या एका पॅलिस्टिनी समर्थक तरुणाने खेळपट्टीकडे धाव घेतली आणि विराट कोहलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्याने अंगात लाल रंगाची चड्डी (शॉर्ट) आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. टी-शर्टवर समोरच्या बाजूला ‘पॅलेस्टाईनवर बॉम्ब टाकणं बंद करा’ आणि मागच्या बाजूला ‘फ्री पॅलेस्टाईन’ असा संदेश लिहिला होता. या प्रकारानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी चांदखेडा पोलीस ठाण्यात आणलं.

हेही वाचा- IND vs AUS Final: पॅलेस्टाईन समर्थक तरुणाचा विराटला मिठी मारण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

विशेष म्हणजे, गेल्या जवळपास ४४ दिवसांपासून इस्रायल आणि हमास संघटनेत युद्ध सुरू आहे. ७ ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली. यानंतर इस्रायलकडून सातत्याने पॅलेस्टाईनवर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनवरील बॉम्ब हल्ले थांबवावे, असा संदेश देण्यासाठी संबंधित तरुणाने स्टेडियममध्ये धाव घेतली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs australia final man who enters in field to meet virat kohli give reaction support palestine rmm