India vs England 5th Test: भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने पाचव्या कसोटीत दमदार शतकी खेळी केली. ओव्हल कसोटीतील तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालने १२७ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. हे या मालिकेतील यशस्वी जैस्वालचं दुसरं शतक ठरलं आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने दमदार शतक झळकावलं होतं. तसेच हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावं शतक ठरलं आहे.
परदेशात सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय सलामीवीर फलंदाज
परदेशात फलंदाजी करताना सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम हा माजी फलंदाज सुनील गावसकरांच्या नावावर आहे. सुनील गावसकर यांनी ८१ डावात फलंदाजी करताना १५ शतकं झळकावली आहेत. तर केएल राहुल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. केएल राहुलने ५७ डावात ७ शतकं झळकावली आहेत. यशस्वी जैस्वालने आता सर्वात कमी डावात सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवागला मागे टाकलं आहे. वीरेंद्र सेहवागने हा पराक्रम ५९ डावात केला होता. तर यशस्वी जैस्वालने हा पराक्रम अवघ्या २७ डावात केला आहे.
परदेशात फलंदाजी करताना सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय फलंदाज
सुनील गावसकर – १५ शतकं, ८१ डाव
केएल राहुल – ७ शतकं, ५७ डावात
यशस्वी जैस्वाल – ४ शतकं, २७ डावात
वीरेंद्र सेहवाग – ४ शतकं, ५९ डावात
या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेला भारतीय २३ धावांनी पिछाडीवर होता. दुसऱ्या दिवशी डावाची सुरुवात करताना भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. सलामीवीर फलंदाज केएल राहुल अवघ्या ७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला साई सुदर्शन अवघ्या ११ धावांवर माघारी परतला.
त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि नाईट वॉचमन यांनी मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली. आकाशदीप ६६ धावांची खेळी करत माघारी परतला. त्यानंतर यशस्वी जैस्वालने १२५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. भारतीय संघाने या सामन्यात २५० हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.