नॉटिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड संघात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. बिनबाद २१ धावांवरून भारताने आज पुढे खेळायला सुरुवात केली. उपाहारापर्यंत भारताने ३७.१ षटकात १ बाद ९७ धावा केल्या आहेत. रोहित-राहुलने पहिल्या गड्यासाठी ९७ धावा उभारल्या. भारताने आपला पहिला गडी रोहित शर्माच्या रुपात गमावला. ओली रॉबिन्सनने त्याला वैयक्तिक ३६ धावांवर माघारी धाडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडला थक्क केले. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या भारताच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ १८३ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर भारताने खेळायला सुरुवात केली. आज उपाहारापर्यंत सलामीवीर लोकेश राहुल ४८ धावांवर नाबाद आहे. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार ठोकले.

 

हेही वाचा – Tokyo 2020 : ऐतिहासिक क्षण, पण सुवर्णपदकाची हुलकावणी; रवी दहियाला रौप्यपदक!

इंग्लंडचा डाव

इंग्लंडकडून रोरी बर्न्स आणि झॅक क्रॉले यांनी सलामी दिली. भारताचा तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. बर्न्सला बुमराहने शून्यावर पायचित पकडले. बर्न्सने पाच चेंडू खेळले, पण त्याला एकही धाव घेता आली नाही. बर्न्सनंतर झॅक क्रॉले मैदानात आला. तो स्थिरावला असताना मोहम्मद सिराजने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. क्रॉलेने ४ चौकारांसह २७ धावा केल्या.

उपाहारानंतर डॉमिनिक सिब्ले वैयक्तिक १८ धावांवर माघारी परतला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याला राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर  जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडच्या डावाला आधार दिला. या दोघांनी ७२ धावांची भागीदारी रचली. चहापानापर्यंत जो रूटने आपले अर्धशतक पूर्ण केले. तर  शमीच्या गोलंदाजीवर बेअरस्टो माघारी परतला. त्याने २९ धावा केल्या.  चहापानानंतर इंग्लंडची एक बाजू सांभाळणारा रूट माघारी परतला. रूटने ११ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. मुंबईकर गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याला पायचित पकडले. त्यानंतर एका बाजूने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले. सॅम करनने ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २७ धावांची आतषबाजी खेळी करत सामन्यात रंगत निर्माण केली. बुमराहने जेम्स अँडरसनची दांडी गुल करत इंग्लंडचा डाव संपवला. त्याने ४६ धावांत ४ बळी घेतले. मोहम्मद शमीला ३ आणि शार्दुल ठाकूरला २ बळी घेता आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england first test second day lunch report adn
First published on: 05-08-2021 at 17:49 IST