फिरकी गोलंदाजांनी माझी अत्यंत निराशा केली आहे, असे पराभवाने खचलेला भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले. २०१२च्या उत्तरार्धात भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडने वानखेडे स्टेडियमवर मालिकेचे चित्र पालटले, त्यानंतर धोनी हताश झाला होता. अहमदाबादच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडने भारतीय रणनीतीचा वापर करून विजयाध्याय लिहिला. मागील पाच वर्षांतल्या भारताच्या कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीचा आढावा घेतल्यास दोन मानहानीकारक पराभव हे इंग्लंडविरुद्धचे आहेत, हे कुणीही नाकारणार नाही. मात्र सद्य:स्थितीत दोन्ही संघांची कामगिरी, खेळाडू आणि वातावरणाचा अभ्यास केल्यास भारताला पाच सामन्यांच्या मालिकेवर वर्चस्व प्राप्त करणे अजिबात जड जाणार नाही, असा जाणकारांचा अंदाज आहे. मायदेशी असो की परदेशी, इंग्लंडने भारताविरुद्धच्या मागील तिन्ही कसोटी मालिका जिंकल्या आहेत, त्याची पुनरावृत्ती त्यांना आगामी पाच सामन्यांच्या मालिकेत करता येऊ शकेल का, याबाबत साशंका व्यक्त केली जात आहे. मात्र मैदानावरील सामन्याच्या पलीकडे लोढा समितीच्या शिफारशींमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच मालिका समीप आली असतानाही तिचे भवितव्य मात्र अधांतरी आहे.
विराटचे नेतृत्व आणि विजयाची खात्री
डिसेंबर २०१४ मध्ये ऑस्टेलिया दौऱ्यावर भारतीय संघ असताना महेंद्रसिंग धोनीला दुखापत झाल्यामुळे ओढवलेल्या कठीण परिस्थितीत विराट कोहलीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलियाचा असला तरी कोहलीच्या नेतृत्वाची ती कसोटी ठरली. त्याने दोन्ही डावांत शतके ११५ आणि १४१) झळकावली.
अॅडलेडची ही रोमहर्षक कसोटी भारताने दुर्दैवाने गमावली. त्यानंतर अखेरची कसोटी शिल्लक असताना धोनीने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे स्वाभाविकपणे कोहलीचाच राज्याभिषेक उरकण्यात आला. भारताने शेवटची कसोटी अनिर्णीत राखली. कोहलीने या सामन्यातसुद्धा शतक साकारले. तेव्हापासून आतापर्यंत कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १७ सामन्यांपैकी १० सामने जिंकले आहेत, दोन गमावले आहेत आणि पाच अनिर्णीत राखले आहेत. त्याच्या यशाची टक्केवारी ५८.८२ टक्के इतकी आहे. संघनायकाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या कोहलीने पहिल्या चारही कसोटी सामन्यांत शतके साकारली, त्याचप्रमाणे कर्णधारपदाच्या १८व्या डावात हजार धावांचा टप्पा ओलांडला. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील एकमेव सामन्यातील पराभव वगळल्यास श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या मालिका भारताने आरामात जिंकल्या. सध्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे भारताच्या आश्वासक कामगिरीत इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयाचा आणखी एक मानाचा तुरा खोवला जाऊ शकतो.
अपयशाच्या कटू स्मृती
२०११ मध्ये भारतीय भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगज्जेतेपद प्राप्त केल्यानंतर काही महिन्यांतच झालेला इंग्लंड दौरा भारतासाठी अतिशय वाईट ठरला होता. राहुल द्रविड वगळता एकाही फलंदाजाला इंग्लिश वातावरणात नीटपणे फलंदाजी करता आली नाही, परिणामी चारही कसोटी सामन्यांत इंग्लंडने ४-० असे निभ्रेळ यश मिळवले. जागतिक कसोटी क्रमवारीतील भारताचे अग्रस्थानसुद्धा त्यांनी हिसकावून घेतले होते. अॅलिस्टर कुक, केव्हिन पीटरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि ग्रॅमी स्वान यांनी इंग्लंडच्या विजयाचा अध्याय लिहिला होता. त्यानंतर ऑस्टेलिया दौऱ्यावरसुद्धा भारताच्या नावावर आणखी एक पराभवाची मालिका नोंदली गेली. वर्षभराने इंग्लिश संघ भारत दौऱ्यावर आला, तेव्हा भारतीय संघ फिरकीच्या बळावर त्या पराभवाचा वचपा काढणार अशी अपेक्षा होती. अहमदाबादच्या पहिल्या कसोटीत सारे काही अपेक्षेप्रमाणे घडले. पण मुंबई आणि कोलकाताच्या दोन सामन्यांवर इंग्लंडने प्रभुत्व मिळवत मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवला. माँटी पनेसार आणि ग्रॅमी स्वान या इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी एकूण ३७ बळी घेतले. कर्णधार कुक आणि पीटरसन यांनी भारताची फिरकी आरामात खेळून काढली. भारत दौऱ्यावर तीन आठवडे आगाऊ आलेल्या इंग्लिश संघाला सराव सामन्यांमध्ये जाणीवपूर्वक फिरकी खेळपट्टय़ा देण्यात आल्या नव्हत्या. आगामी मालिकेत इंग्लंडला पीटरसन, पनेसार आणि स्वानची उणीव तीव्रतेने भासणार आहे.
इंग्लंडच्या कामगिरीबाबत साशंकता
इंग्लंडचा संघ बांगलादेशविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत झगडताना आढळला होता. बांगलादेशने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखल्यामुळे आगामी मालिकेत इंग्लंडच्या कामगिरीबाबत माफक अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे २०१२ची पुनरावृत्ती करणे त्यांना कठीण जाऊ शकेल. बेन डकेट, गॅरी बॅलन्स, बेन स्टोक्स आणि जो रूट यांच्यावर इंग्लंडच्या फलंदाजीची मदार असेल. फिरकी गोलंदाजीचा आशियाई वातावरणात सामने करणे हे इंग्लंडच्या फलदाजांसमोर प्रमुख आव्हान असेल. मागील वर्षी संयुक्तअरब अमिरातीत पाकिस्ताविरुद्धची मालिका इंग्लंडने गमावली होती. तर यंदा ऑगस्टमध्ये पाकिस्तानने इंग्लंडच्या भूमीवर २-२ अशी बरोबरी साधली. या वेळी यासिर शाहची फिरकी त्यांना डोईजड झाली होती. अगदी ताज्या मालिकेतही इंग्लंडच्या ४० बळींपैकी ३९ हे बांगलादेशच्या फिरकीचे यश होते. या वेळी ऑफ-स्पिनर मोईन अली, गॅरेथ बॅट्टी, लेग-स्पिनर आदिल रशिद आणि डावखुरा फिरकी गोलंदाज झफर अन्सारी यांच्यावर इंग्लंडच्या फिरकीची जबाबदारी असेल. या चौघांनी बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत एकूण २४ बळी मिळवले होते. आशियाई खंडातील फिरकीचे आव्हान पेलण्यासाठी ३९ वर्षीय बॅट्टीला इंग्लंडच्या निवड समितीने बांगलादेश दौऱ्यासाठी संघात बोलावले होते. त्याच्या कारकीर्दीतील आठ कसोटी सामन्यांपैकी सात सामने तो ११ वर्षांपूर्वी खेळला आहे. वेगवान गोलंदाजीचा विचार केल्यास अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. दुखापतीतून सावरलेला जिम्मी अँडरसन इंग्लंडच्या संघात लवकरच दाखल होतो आहे, ही त्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ राजकोटला दाखल
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी शनिवारी सकाळी राजकोटला दाखल झाला. स्थानिक खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा भारतीय संघात सामील झाले. कोहलीचा शनिवारी वाढदिवस असून, तो अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत राजकोटला आला आहे. गौतम गंभीर, जयंत यादव, अमित मिश्रा आणि इशांत शर्मा हे खेळाडू सकाळी आठच्या सुमारास राजकोटला पोहोचले. हार्दिक पंडय़ासुद्धा दुपापर्यंत येथे दाखल झाला, अशी माहिती सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे प्रसारमाध्यम प्रतिनिधी हिमांशू शाह यांनी दिली.
प्रशांत केणी
prashant.keni@expressindia.com
