India vs India A Intra Squad Match: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून हेडिंग्लेमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय अ संघ आणि भारतीय संघात इंट्रा स्क्वॉड सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय अ संघातील फलंदाज सरफराज खानने मुख्य संघातील गोलंदाजांची धुलाई करत दमदार शतकी खेळी केली आहे. त्याने दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना ७६ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. तर प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एकही गडी बाद करता आलेला नाही.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय अ संघाने दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना ४५९ धावांचा पाठलाग करताना ६ गडी बाद २९९ धावा केल्या आहेत. भारतीय अ संघाकडून फलंदाजी करताना इशान किशन ४५ तर शार्दुल ठाकूर १९ धावा करत नाबाद माघारी परतला आहे. या शतकी खेळीदरम्यान सरफराजने २ गगनचुंबी षटकार आणि १५ चौकार मारले.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी बीसीसीआयने १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात सरफराज खानचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याला भारतीय अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. या दमदार खेळीसह त्याने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे. याआधी इंग्लंड लायन्स संघाविरूद्ध झालेल्या अनधिकृत कसोटी सामन्यातही त्याची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने इंग्लंड लायन्सविरूद्ध ९२ धावांची खेळी केली होती.

भारतीय अ संघाबद्दल बोलायचं झालं, या सामन्यात सलामीला आलेला फलंदाज ऋतुराज गायकवाड स्वस्तात माघारी परतला. त्याला मोहम्मद सिराजने बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने ३९ आणि साई सुदर्शनने शानदार ३८ धावांची खेळी केली. साई सुदर्शनचा १८ सदस्यीस प्रमुख संघात समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे त्यानेदेखील प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे. भारतीय संघातील गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर जसप्रीत बुमराहला एकही गडी बाद करता आलेला नाही. मोहम्मद सिराजने ८६ धावा खर्च करत २ गडी बाद केले. तर प्रसिद्ध कृष्णाने ४१ धावा खर्च करत २ गडी बाद केले. डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनेही ५२ धावा खर्च केल्या, मात्र त्याला एकही गडी बाद करता आलेला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs india a intra squad match sarfaraz khan scored dashing century ahead of test series cricket news in marathi amd