मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘प्रभावी खेळाडू’च्या (इम्पॅक्ट प्लेयर) नियमामुळे प्रत्येक संघाला एका अतिरिक्त भारतीय खेळाडूला संधी देता येत आहे, जी नक्कीच चांगली बाब आहे. मात्र, या नियमामुळे प्रत्येक संघाला १२ खेळाडूंनी खेळता येते. परंतु माझ्या मते, क्रिकेटची खरी मजा ही ११ खेळाडूंनी खेळण्यातच आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्माने व्यक्त केली.

‘आयपीएल’मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रभावी खेळाडूच्या नियमाबाबत गेल्या काही काळापासून बरीच चर्चा केली जात आहे. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंच्या प्रगतीला खीळ बसत असल्याचे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले होते. विराट कोहलीही रोहितशी समहत होता. या नियमामुळे बॅट आणि बॉल यातील समतोल बिघडला असून गोलंदाज पूर्णपणे हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे, असे कोहली ‘आयपीएल’दरम्यान म्हणाला होता. तसेच ‘आयपीएल’मध्ये पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जितेशनेही ११ खेळाडूंनी खेळण्यासच आपली पसंती असेल, असे म्हटले आहे.

हेही वाचा >>> T20 WC 2024: हिरी हिरी, चाड सोपर, असद्दोला वाला – ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळणारी कोण ही मंडळी?

‘‘प्रभावी खेळाडूच्या नियमाकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. यातील पहिला दृष्टिकोन म्हणजे या नियमामुळे आता ‘आयपीएल’मधील प्रत्येक संघाला एका अतिरिक्त भारतीय खेळाडूला संधी देता येत आहे. या खेळाडूची प्रतिभा जगासमोर येते. या संधीमुळे खेळाडूचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. तसेच दुसरा दृष्टिकोन म्हणजे, या नियमामुळे गोलंदाजांवरील ताण वाढला आहे. त्यांचे काम खूपच अवघड झाले आहे,’’ असे मत जितेशने व्यक्त केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी प्रभावी खेळाडूचा नियम हा प्रयोगिक तत्त्वावर असून याबाबत पुनर्विचार केला जाऊ शकतो असे म्हटले होते. हा नियम पुढील हंगामातही कायम राहिला पाहिजे का, असे विचारले असता जितेश म्हणाला, ‘‘क्रिकेटची खरी मजा ११ खेळाडूंनी खेळण्यातच आहे. तुमचे काही निर्णय चुकतात. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर तुम्ही चार वेगवान गोलंदाज खेळवता आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. फलंदाज म्हणून तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाची रचना पाहून योजना आखता येते. समोरच्या संघात चारच प्रमुख गोलंदाज असल्यास पाचव्या गोलंदाजाला तुम्हाला लक्ष्य करता येते. मात्र, प्रभावी खेळाडूच्या नियमामुळे तुम्हाला अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळवता येतो. यामुळे सामन्यांतील मजा काही प्रमाणात कमी झाली आहे, असे माझे मत आहे.’’