दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर हरमनप्रीत कौरने अफलातून झेल टिपला आणि हरमनप्रीत कौरच्या फौजेनं महिनाभर सुरू असलेली मोहीम फत्ते करत वूमन्स वर्ल्डकप २०२५च्या जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचं आव्हान परतावून लावत भारतीय महिला संघाने पहिल्यावहिल्या ऐतिहासिक जेतेपदाची कमाई केली. कपिल देव (१९८३), महेंद्रसिंग धोनी (२००७, २०११), रोहित शर्मा (२०२४) या मांदियाळीत आता हरमनप्रीत कौरच्या नावाचा समावेश झाला आहे. नवी मुंबईतल्या नेरुळ इथल्या डीवाय पाटील अकादमी स्टेडियमवर ३५०००हून अधिक चाहत्यांच्या साक्षीने हरमनप्रीतने जेतेपदाचा करंडक उंचावला आणि देशभरातल्या क्रिकेटचाहत्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. २०१७ मध्ये भारतीय संघाला वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्या पराभवाचा सल मोडून काढत भारतीय महिला संघाने न भूतो न भविष्यती अशी देदिप्यमान कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या बलाढ्य संघांना सेमी फायनलमध्ये गाशा गुंडाळावा लागल्याने यंदा वर्ल्डकपला नवा विजेता मिळणार हे स्पष्ट झालं होतं. शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
वर्ल्डकप फायनलध्ये विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना लॉरा वूल्व्हडार्ट आणि ताझमिन ब्रिट यांनी खणखणीत सुरुवात केली. दवामुळे गोलंदाजांचं चेंडूवरचं नियंत्रण कमी होत असताना या दोघींनी धावा वसूल केल्या. मात्र चोरटी धाव घेण्याचा ताझमिनचा प्रयत्न अमनज्योतच्या अचूक थ्रो मुळे संपुष्टात आला. तिने २३ धावा केल्या. अनीके बॉशसाठी यंदाचा वर्ल्डकप निराशाजनक ठरला. श्री चरणीने तिला भोपळाही फोडू दिला नाही. सून ल्यूसने लॉराला साथ दिली. या दोघींनी सातत्याने चौकार वसूल केले. आफ्रिकेच्या बाजूने सामना झुकत असताना हरमनप्रीत कौरने शफाली वर्माला गोलंदाजीसाठी आणलं. नियमित गोलंदाजी न करणाऱ्या शफालीच्या फसव्या स्लोअर चेंडूवर लूसने शफालीकडेच झेल दिला. लूस ज्या पद्धतीने धावा करत होती ते पाहता भारतासाठी तिची विकेट अत्यंत महत्त्वाची होती. हरमनप्रीतचा शफालीला गोलंदाजी देण्याचा निर्णय फळला. पुढच्याच षटकात शफालीने मारिझान कापला बाद करत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. एकीकडे साथीदार बाद होत असताना लॉराने चिवटपणे झुंज दिली. सिनलो जाफ्ताने १६ धावा करत लॉराला साथ दिली. दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर राधा यादवने तिचा झेल टिपला. लॉरा आणि अॅनरी डर्कसेन यांनी ६१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ही भागीदारी सामना भारतापासून हिरावून घेणार असं वाटत असतानाच दीप्ती शर्माच्या यॉर्करवर डर्कसेन त्रिफळाचीत झाली. तिने ३५ धावांची खेळी केली. सेमी फायनलमध्ये १६९ धावांची मॅरेथॉन खेळी साकारणाऱ्या लॉराने फायनलमध्येही शतकी खेळी साकारली. हा विक्रम करणारी ती केवळ दुसरी खेळाडू आहे. शतकानंतर लगेचच आक्रमणाचा लॉराचा प्रयतन अमनज्योत कौरच्या अफलातून झेलमुळे संपुष्टात आला. प्रचंड अंतर धावून येत अमनज्योतने झेल टिपला. तिच्या हातातून चेंडू सुटला पण तिसऱ्या प्रयत्नात तिने झेल घेतला. लॉराने १०१ धावांची खेळी केली. पाठोपाठ दीप्तीने चोले ट्रायोनला एलबीडब्ल्यू केलं. नादिन क्लार्कने विशाखापट्टणमच्या लढतीप्रमाणे या सामन्यातही चौकार, षटकारांना सुरुवात केली. श्री चरणीच्या महागड्या ठरलेल्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर चोरटी धाव घेताना अयाबोंगा खाका रनआऊट झाली.
शफालीचा तडाखा;दीप्ती-ऋचाची खंबीर साथ
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वूल्व्हडार्टने टॉस जिंकला आणि बॉलिंगचा निर्णय घेतला. मोठ्या स्पर्धेत फायनलच्या मुकाबल्यात प्रथम फलंदाजी घेऊन मोठी धावसंख्या उभारायची आणि उत्तरार्धात या धावसंख्येचा बचाव करायचा हे बहुतांश संघांचं धोरण असतं. पण लॉराने वेगळा निर्णय घेतला. पावसामुळे ही लढत दोन तास उशिराने सुरू झाली. खेळपट्टी बराच काळ कव्हर्स आच्छादित होती. चेंडू स्विंग होईल आणि गोलंदाज फायदा उठवू शकतील असा लॉरा आणि दक्षिण आफ्रिकेचा होरा होता.
प्रतिका रावळ बांगलादेशविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झाल्यामुळे शफाली वर्माला संघात समाविष्ट करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत शफालीने चौकारासह सुरुवात केली पण त्यानंतर ती बाद झाली. फायनलच्या लढतीत मात्र शफालीने सूत्रधाराची भूमिका स्वीकारली. तडाखेबंद आक्रमणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शफालीने पहिल्या ओव्हरपासून आक्रमक इराद स्पष्ट केले. अनुभवी स्मृतीने सावध सुरुवात केली. पहिली ओव्हर मेडन जाऊ दिल्यानंतर या दोघींनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचण्यादृष्टीने काम केलं. दक्षिण आफ्रिकेकडे विविधांगी स्वरुपाचे गोलंदाज आहेत हे जाणून दोघींनीही चांगल्या चेंडूना सन्मान देण्याचं धोरण स्वीकारलं. खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर या दोघींनी मुक्तपणे फटकेबाजी केली. या दोघींनी शंभरीपल्याड सलामी दिली. ट्रायॉनच्या चेंडूवर कट करण्याचा स्मृतीचा प्रयत्न विकेटकीपर जाफ्ताच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावला. स्मृतीने ८ चौकारांसह ४५ धावांची खेळी केली.
सेमी फायनलची नायिका जेमिमाने शफालीला स्ट्राईक देण्यावर भर दिला. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या शफालीची खेळी खाकाने संपुष्टात आणली. मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फटका मारण्याचा शफालीचा प्रयत्न फसला. ल्यूसने अतिशय शिताफीने झेल टिपला. शफालीने ७ चौकार आणि २ षटकारांसह ७८ चेंडूत ८७ धावांची खेळी केली.
मोठ्या खेळीसाठी तय्यार वाटणाऱ्या जेमिमाने खाकाच्या गोलंदाजीवर मारलेला फटका आफ्रिकेची कर्णधार लॉराच्या हाती गेला. पंचांनी रिप्लेमध्ये झेल नीट आहे ना याची पाहणी केली. लॉराने झेल जमिनीपासून दूर टिपल्याचं स्पष्ट झालं. जेमिमाने २४ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. एकेरी, दुहेरी धावांवर भर देत हरमनप्रीतने डावाला सुरुवात केली. मलाबाने हरमनप्रीतला त्रिफळाचीत केलं. ती २० धावा करू शकली. भारताचा डाव भरकटणार असं चित्र असताना दीप्ती शर्माने सूत्रं हाती घेतली. दीप्तीने सुरुवातीला अमनज्योत आणि त्यानंतर ऋचा घोषबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दीप्तीने केलेली ५८ धावांची खेळी निर्णायक ठरली. ऋचाने २४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३४ धावा केल्या आणि भारताने पावणेतीनशेचा टप्पा ओलांडला. एकाक्षणी ३२०-३२५ धावा होतील असं चित्र असताना दक्षिण आफ्रिकेने शिस्तबद्ध गोलंदाजी करत भारताला तीनशेच्या आत रोखलं. भारताने २९८ धावांची मजल मारली. आफ्रिकेतर्फे अयाबोंगा खाकाने ३ विकेट्स घेतल्या.
जेतेपदापर्यंतचा प्रवास
सलामीच्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध भारताला चांगलाच संघर्ष करावा लागला. घरच्या मैदानावर चाहत्यांची प्रचंड अशी साथ असतानाही भारतीय संघ अडखळत होता. यानंतर भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी श्रीलंका गाठलं. शिरस्त्याप्रमाणे भारतीय संघाने पाकिस्तानला हरवलं. दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभवाचा दणका दिला. यानंतर गतविजेत्या ऑस्ट्रेलियानेही भारताला नमवलं. इंग्लंडविरुद्ध विजयपथावर असताना भारतीय संघाने सामना गमावला. सलग तीन सामने हरल्यामुळे भारतीय संघ बाद फेरी तरी गाठणार का असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र डीवाय पाटील स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवत भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये जागा पक्की केली. बांगलादेशविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. सेमी फायनलमध्ये भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान होतं. ऑस्ट्रेलियाने दिलेलं डोंगराएवढं लक्ष्य पार करत भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली.
